जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत का होईना ग्रामीण भागातील महिलांना आत्मसन्मानाची, स्वची जाणीव, स्वकर्तृत्वावर उभे राहण्याची महती आणि माहितीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत हे भूषणावह आहे. खर्या अर्थाने स्त्रीत्वाचा सन्मान अविरतपणाने होणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु, आज एकविसाव्या शतकात स्त्री स्वत:ला कायम कमी लेखते. स्त्री ही स्त्रीची कायम वैरी नि शत्रू आहे. म्हणून स्त्री जातीच्या उत्कर्षाच्या मार्गातील अडसर दूर होत नाही.
वास्तविक पाहता महिला संघटन होणे अत्यंत गरजेचे आहे नव्हे काळाची गरज बनत आहे. आजही अबला ह्या संपूर्णपणे, स्वयंस्फूर्ततेने सबला झालेल्या नाहीत. शिवाय ज्या सबला आहेत, त्या स्वत:च्या पायावर, ताठ मानेने, स्वाभिमानाने उभ्या आहेत का? त्या पुन्हा पुन्हा स्वत:ला चाकोरीबंद चौकटीत अबला मानून घेण्यात धन्यता मानतात. कारण आपण बिनधास्तपणाने वागलो तर आपल्या स्त्रीत्वाचा सर्वश्रेष्ठ अलंकार म्हणजेच चारित्र्य यावर नक्कीच कोणीतरी घाला घालेल किंवा शिंथोडे उडवल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून आपली अलिप्तवादी राष्ट्र चळवळ जोपासून कायम भीतीच्या दहशतीखाली स्वत:ला ठेवणे यात मुख्यत्वे करून महिला वर्ग समाधान मानत असतो.
चाकरमानी महिला नोकरदार फक्त नामधारी नोकरी करतात. त्यांचे पगार मात्र पतिराज ऑनलाइन उचलतात. का तर म्हणे पत्नीला व्यावहारिक ज्ञान कमी आहे आणि शिवाय-एटीएम मशीन चालवता येत नाहिये म्हणून? जर ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नोकरी करू शकते तर मग व्यवहारज्ञान आणि एटीएम मशीन चालवणार नाही हे कशावरून? कसली ही द्वापार युगातली बुरसटलेली पुरुषी अहंकारी मानसिकता? पूर्वीच्या काळी जसे रांधा-वाढा अन् उष्टी काढा एवढेच काय ते चूल नि फक्त उपभोगी वस्तू म्हणून मुलं उत्पादित करण्याचा कारखाना म्हणून स्वत:च्या करिअरची धन्यता मानणारी आजीबाईची काष्टावृत्ती ही लाचारीचीच होती यात काही शंका नाही, अशा जोखडाचा पाश झुगारून जगाच्या व्यापक कक्षेचा अभ्यास करून प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करण्याची उर्मी, जिद्द, साहस आजच्या युवातरुणींनी खुणगाठ बांधून घ्यायला हवी. लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची धमक नि मक्तेदारीचा ठेका फक्त पुरुषांमध्येच नसून महिलाही त्याबाबतीत कुठेही कमी नाहीत कारण गुणवत्तेच्या बाजाराचा आलेख पाहता मुलांपेक्षा मुलींची टक्केवारींची सरासरी सर्वाधिक सर्वश्र्रुत आहे. याचा प्रत्यक्ष प्रत्यय केंद्रीय लोकसेवा आयोग नव्हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग सोबतच दहावी बारावी परीक्षा निकालानंतर सहज दिसून येतेय.
प्रेरणा, स्फूर्ती, आत्मविश्वास, चिकाटी, जिद्द, उत्तम स्वास्थ्य, ध्येय या सर्व गुणांमुळे महिला नोकरदार वर्ग पुरुषी नोकरदार वर्गापेक्षा भ्रष्टाचार कमी करतात हा आजपर्यंतच्या जीवन जगण्याच्या कार्यशाळेतील प्रयोग सर्वेक्षणाची फलश्रुती आहे. लेकी- बाळी- सुना शिकून सवरून मोठ्या हुद्यावर जाताहेत. एक पारदर्शी, वास्तववादी भूमिका स्वत: जगून इतरांना ती जगण्याचा आदर्श पायंडा घालून देत आहेत. म्हणूनच की काय आज भारताच्या प्रत्येक क्षेत्रात कित्येक महिला ह्या आपापली जबाबदारी अगदी कर्तव्यनिष्ठपणाने नि निर्णायकवृत्तीने पेलताना जगजाहीर सिद्ध होताहेत. म्हणूनच लवकरच भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न, मिसाइलमॅन डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत एक जागतिक महासत्ता बनू पाहतो आहे. यात प्रामुख्याने ग्रामीण भारतातील स्त्री महिला वर्गाचा नि त्यांच्या अफाट तसेच अगाध शिक्षणाचा व कल्पनाशक्तीचा सिंहाचा वाटा असणार आहे हे दूरदृष्टीदायक विधान येत्या भविष्यकाळात सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही यात काही शंका नाही. पीरियड्स म्हणजे विटाळ नसून तो स्त्रित्वाची अलंकार आहे नव्हे तर जाणीव आहे. त्याशिवाय स्त्रीत्व नि मातृत्व या संकल्पना पूर्ण होऊच शकत नाहियेत. निसर्ग मानव चक्रातील स्त्री हा अविभाज्य घटक आहे. पीरियड्सच्या बाबतीत कुजबुज न होता त्याच्या स्वच्छतेची काळजी सॅनिटरी नॅपकिन पॅडबाबतीत किशोरवयीन मुलींमध्ये जाणीव जागृती करताना विद्यमान मायबाप महाराष्ट्र सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. म्हणूनच या वर्षीच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत अस्मिता योजना संबंध महाराष्ट्रभर लागू केली जात आहे.
यामध्ये फक्त नाममात्र पाच रुपयांत आठ सॅनिटरी नॅपकिनचे पॅड संच महाराष्ट्रातील 11 ते 19 वयोगटांतील मुलींना उपलब्ध होणार आहेत. या विधायक दूरदृष्टी महत्त्वाकांक्षी अस्मिता योजनेमुळे भावी काळातील बाळतींण-माता मृत्यूच्या प्रमाणात नक्कीच आळा बसणार आहे. जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घर घर शौचालय का नारा दिला जातो आहे. त्यासाठी विविध माध्यमातून विद्यमान भारत सरकार प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत. म्हणूनच की काय निराधार योजनेची लाभार्थी असणारी दुर्गम डोंगराळ भागातील अशिक्षित-अडाणी आदिवासी महिला घरात शौचालय बांधून गावासमोर स्त्रियांच्या भावी पिढ्यांच्या आरोग्याची काळजी घेताना दिसतेय यातून शौचालय आरोग्य क्रांती होते आहे. सरते शेवटी आज शहरी भागांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गणपती उत्सव, दुर्गा उत्सव, विविध जातीच्या महापुरुषांच्या जयंती महोत्सवात नि गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या आपापल्या लाडक्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी बहुउद्देशीय स्वयंसेवी संघटना कुमारी मातांच्या पालन पोषणाची, स्त्री रोगनिदान शिबिर, गर्भ कॅन्सर, स्तन कॅन्सर किंवा महिलांच्या गुप्त शारीरिक मानसिक आजाराविषयीची जाहीररीत्या महाआरोग्य शिबिरे घेऊन एक आगळ्यावेगळ्या निकोप सुदृढ समाजाची मोट बांधण्यात यशस्वी होताहेत. यात प्रामुख्याने महिला वर्ग पुढाकार घेताना दिसतो आहे. यात सोशल मीडियाची चळवळ अग्रेसर आहे. त्यातूनच शहरी इंडियाची नि ग्रामीण भारताची दुरावलेली विषमता काहीअंशी का होईना समता आणि समानतेच्या तत्त्वातून सुवर्णमध्य साधत आहेत. म्हणूनच या जागतिक महिला दिनानिमित्त तमाम माता-भगिनींना हार्दिक शुभेच्छा!
– आप्पासाहेब सुरवसे
साहित्य दर्पण,उस्मानाबाद
9403725973