तिच्याही आयुष्यात आनंद फुलवा

0

पुणे (माधुरी सरवणकर) : आई या शब्दातच किती मायेची उब आहे ना! दिवस रात्र एक करून आपल्या मुलांचे संगोपन करत असते. आयुष्यभर झटणार्‍या या आईला मात्र आयुष्याच्या उतरणीला वृद्धाश्रमाची वाट दाखविली जाते. आजच्या पिढीने आपल्या व्यस्त जीवनातही आईला विशेष स्थान द्यावे व तिच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन मराठी प्रसिद्ध तारकांनी जनशक्तिशी बोलताना केले.

तेजस्विनी पंडीत
माझी आई ही माझी मैत्रीण नाही, कारण आपल्याला अनेक मैत्रिणी असतात. मात्र आई ही एकच असते. आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. माझी आई दररोज माझ्यासाबेतच असते. त्यामुळे तिचे माझ्या आयुष्यातील स्थान शब्दात मांडता येण्यासारखे नाही. आईचा सन्मान फक्त एका विशिष्ट दिवशी केला जाऊ नये असे माझे मत आहे. मदर्स किंवा फादर्स डे, व्हेलेंनटाईन डे किंवा महिला दिवसासारखे कोणतेच जागतिक दिवस मी साजरे करीत नाही. कारण प्रत्येकला विशेष महत्व असते. आणि एका दिवसापूरता व्यक्तीला महत्व देणे चुकीचे आहे. तरूणाईने प्रत्येक दिवशी आईचा सन्मान केला पाहिजे. मी जेव्हा जेव्हा आईसोबत असते तेव्हा तेव्हा मी तो दिवस तिच्यासाठी खास करण्याचा प्रयत्न करत असते.

स्मिता गोंदकर
सध्या मी मुंबईमध्ये आणि माझी आई पुण्यात असते. आमच्या मध्ये बरेच अंतर असले तरी तिच्यावाचून माझे पान हालत नाही. अजूनही मी प्रत्येक गोष्ट तिला विचारून करते. दिवसातून दोन फोन तिला आर्वजून करतेच. तिच्यात मी बाबा, बहिण, आजी , मैत्रीण अशी सर्व नाती पाहते. आईला आपले प्रेम हवे असते. ती फक्त निस्वार्थ प्रेम करत असते. त्यामुळे प्रत्येकाने व्यस्त आयुष्यातून आपल्या आई वडिलांसाठी वेळ काढणे गरजेचे आहे.

सोनाली कुलकर्णी
आईबरोबरचा प्रत्येक क्षण साजरा करण्यासाठी मी प्रयत्न करीत असते. माझ्या मुलीचा जन्म झाल्यानंतर मला आईच्या भावना समजल्या, आईने लहानपणापासूनच प्रेम आणि स्वाभिमान ही मूल्ये शिकवली आणि हीच मूल्ये मी माझ्या मुलीत रूजवण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या आईने खूप कष्ट करून आमचे संगोपन केले. तिची मी आयुष्भर ऋणी तर राहणारच आहे, मात्र तिच्या सारखी आई बनण्याचा प्रयत्न देखील करत आहे. आजच्या तरूण पिढीने मात्र आई वडिलांचा विचार केला पाहिजे. त्यांच्या त्यागाचा सन्मान केला पाहिजे. या मातृदिनाच्या निमित्ताने फेसबुक ने माझ्या आईला आमंत्रण दिले आहे. त्यामुळे माझी आई पहिल्यांदाच उद्या माझ्या फॅन्स बरोबर संवाद साधणार आहे.

प्रार्थना बेहरे, अभिनेत्री
मी मूळची बडोदाची आहे. शिक्षणासाठी पहिल्यांदा मुंबईला जात असताना आई-बाबांनी तू सर्व काही कर पण आमचा विश्‍वास तोडू नको असे सांगितले होते. अजूनही त्यांचा विश्‍वास मी तोडलेला नाही. आई माझ्यासाठी सर्वकाही आहे. जेव्हा मी तिला किंवा ती मला भेटायला येते तेव्हा ती नेहमी रडते आणि काळजी घेण्यास सांगते. कामाच्या निमित्ताने मी तिच्यापासून लांब राहत असल्यामुळे तिची काळजी घेता येत नसल्याचे दुख मला नेहमीच वाटत राहते. पण माझ काम पाहून तिला नेहमीच अभिमान वाटतो. आई होणे खरच भाग्याची गोष्ट असल्याचे मला वाटते.

मानसी नाईक , अभिनेत्री
माझ्या जीवनात आईचा फार मोठा वाटा आहे. तिने ठेवलेल्या विश्‍वासामुळे, दिलेल्या पाठिंब्यामुळे आज मी एक महिला म्हणून या जगात व एक अभिनेत्री म्हणून या चित्रपटसृष्टीत वावरत आहे. मी मुलगी आहे मात्र मुलाप्रमाणे तिला आयुष्यभर खुश ठेवण्याचा विडा उचलला आहे. तसेच माझ्यामुळे तिला कधीच दुख व यातना होणार नसल्याचा शब्द देखील मी तिला दिला आहे. प्रत्येक मुला-मुलीने आपल्या आई वडिलांची काळजी घेऊन त्यांना आनंदित ठेवण्यासाठी प्रयत्न करावा