लोणावळा नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन सोहळा पडला पार
वित्त, नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सुतोवाच
लोणावळा : लोणावळा ते राजमाची हा सात किलोमीटर लांबीचा आशिया खंडातील सर्वात लांब असा रोपे वे उभारण्याचा लोणावळा नगरपरिषदेचा मानस असून त्यासाठी मुनगंटीवार यांनी शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घ्यावा अशी विनंती आमदार बाळा भेगडे यांनी केली. यावर महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याची तिजोरी आणि तिजोरीचा पासवर्ड माझ्याकडे असून तो आमदार भेगडे यांना देऊन जाऊ, असे सांगत पुढच्या टर्ममध्ये आमदार भेगडे हे महत्वाच्या पदावर जाणार असल्याचे सूतोवाच मुनगंटीवार यांनी केले. लोणावळा नगरपरिषदेच्यावतीन नव्याने बांधण्यात आलेल्या वरसोली कचराडेपो, इंद्रायणी नदीवरील पुलाचे उद्घाटन आणि नगरपरिषदेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय या अद्ययावत शाळेचे लोकार्पण मुनगंटीवार यांच्या हस्ते शनिवारी पार पडले.
हे देखील वाचा
विकासकामांचा माहितीपट दाखविला
महाराष्ट्र शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत आठ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला अद्ययावत कचरा डेपो तसेच बांगरवाडी येथे इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचे उद्घाटन आणि नगरपरिषदेच्या सर्वात जुन्या शाळा क्रमांक 1 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय या शाळेची अडीच कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नूतन इमारतीचे लोकार्पण राज्याचे मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर घेण्यात आलेल्या जाहीर सभेपुर्वी लोणावळ्यात मागील दोन वर्षात सुरू करण्यात आलेल्या आणि पूर्ण झालेल्या सुमारे 70 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा आढावा घेणारा माहितीपट दाखविण्यात आला. यावेळी बोलताना मुनगंटीवार यांनी लोणावळ्याच्या विकासासाठी राज्याच्या तिजोरीसह लोणावळा नगरपरिषदेच्या मागे उभे राहण्याचे आश्वासन दिले. पुलासाठी 10 कोटींचा नंतर बोटिंगसाठी 6 कोटींचा निधी उपलब्ध करून देत असल्याचे सांगत विकासासाठी हवा तेव्हडा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. शहराला सुंदर करण्याचे काम फक्त नगरपरिषदेचेच नाही तर ती जबाबदारी येथील नागरिकांची देखील आहे आणि ती प्रत्येकाने पेलली पाहिजे असे आवाहन लोणावळेकरांना केले.
शहरासाठी जास्तीत जास्त निधी
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी देवेंद्र फडणवीस सरकार आणि आमदार बाळा भेगडे यांच्या सहकार्यामुळे मागील दोन वर्षात खूप कामे पूर्ण झाल्याचे प्रतिपादन केले. आमदार बाळा भेगडे यांनी उड्डाणपूलाचे काम सुरू होईल असे आश्वासन देत जास्तीत जास्त निधी शहरासाठी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मावळ गोळीबार प्रकरणात शेतकर्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल आमदार भेगडे यांनी मुनगंटीवार यांचे आभार मानले. यावेळी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, पुणे जिल्हा आरपीआयचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, आरोग्य सभापती ब्रिनदा गणात्रा, बांधकाम सभापती गौरी मावकर, पाणी पुरवठा सभापती पूजा गायकवाड, मागासवर्गीय कल्याण समिती सभापती मंदा सोनवणे, शिक्षण समिती सभापती जयश्री आहेर, नगरसेवक राजू बच्चे, देविदास कडू, दिलीप दामोदरे, निखिल कवीश्वर, बाळासाहेब जाधव, भरत हारपुडे, सुधीर शिर्के, संजय घोणे, नगरसेविका रचना सीनकर, आरोही तळेगावकर, सुवर्णा अकोलकर, संध्या खंडेलवाल यांच्यासह सुनील तावरे, कमलशील म्हस्के, प्रमोद गायकवाड, विनय विद्वांस आदी उपस्थित होते.