गटविकास अधिकारी विलास भाटकर आल्या पावली माघारी: ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर दोघा ग्रामसेवकांना नोटीसा
भुसावळ:तालुक्यातील दर्यापूर येथे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने ग्रामस्थांना मूलभूत सोयी-सुविधा पुरवल्या जात नसल्याने जिल्हा परीषद सदस्यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी कुलूप ठोकले होते. तब्बल नऊ दिवसांपासून ग्रामपंचायतीला कुठूप ठोकण्यात आल्यानंतर सोमवारी भुसावळचे गटविकास अधिकारी विलास भाटकर यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक घेत त्यांची समजूत काढली. यावेळी ग्रामस्थांनी ग्रामसेवक कार्यालयात वेळेवर उपस्थित नसतात, ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी करा व कागदपत्रे द्या, अशी मागणी केली मात्र सकाळपासून दुपारी चार वाजेपर्यंत चाललेल्या चर्चेनंतरही तिढा न सुटल्याने आल्या पावल्या अधिकार्यांना माघारी परतावे लागल्याने ग्रामपंचायतीला मात्र कुलूप कायम राहिले.
ग्रामस्थ लेखी आश्वासनावर ठाम
दर्यापूर येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील नागरीकांना सुविधा पुरवल्या जात नाहीत, गटारी तुडूंब भरल्याने मच्छरांचा उपद्रव वाढला आहे तसेच स्वच्छतादेखील ठेवली जात नाही, ग्रामपंचायतीला प्राप्त होणारा निधी याबाबत असणारे विविध रजिस्टर याठिकाणी नसून भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करत गावकर्यांनी निवेदन दिले होते परंतु या निवेदनावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने गावकर्यांनी नऊ दिवसापूर्वी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले होते. यामुळे प्रचंड खळबळ उडाली. कुलूप उघडण्यासाठी विस्तार अधिकारी उमेश पाटणकर व कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र फेगडे यांनी भेट घेऊन गावकर्यांची समज काढण्याचा प्रयत्न केला परंतु कागदपत्र द्या अथवा लेखी लिहून द्या याशिवाय कुलूप उघडू देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने अधिकार्यांना सोमवारी परतावे लागले. सोमवारी गटविकास अधिकारी विलास भाटकर यांनी गावात येऊन गावकर्यांची भेट घेतली. यावेळी ग्रामसेवक बारेला व आनंदा सुरवाडे यांच्या कारकिर्दीत प्रचंड प्रमाणावर अनियमितता झालेली असून या प्रकरणाची चौकशी व्हावी त्यानंतरच कार्यालय उघडू देऊ, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. यावेळी गटविकास अधिकार्यांनी त्यांची समजूत काढत एक महिन्यात चौकशी करून कारवाई केली जाईल मात्र यावर गावकर्यांच्या समाधान न झाल्याने माघारी परतावे लागले.
तक्रारीवरून कारवाई सुरू
तक्रार निवेदनावरून संबंधित दोन्ही ग्रामसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. चौकशी समितीदेखील गठीत करण्यात आली आहे यासाठी कालावधी लागणार आहे त्यामुळे गावकर्यांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर चौकशीदेखील केली जाईल तसेच हवे ते कागदपत्र देखील दिले जातील परंतु कुलूप उघडू न दिल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत, असे गटविकास अधिकारी म्हणाले.
यांची होती उपस्थिती
पं.स.चे विस्तार अधिकारी उमेश पाटणकर, कार्यालयीन अक्षीक्षक राजेंद्र फेगडे, ग्रामसेवक आर.एस.चौधरी, रत्नाकर चौधरी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सुनील कोळी, कुसूम गायकवाड, छाया तायडे, अपेक्षा शिंदे, सदस्य रामकृष्ण खोंडे, बोधीसत्व अहिरे, नितीन सोनवणे, जीवराम सुरवाडे आदी तसेच गावचे पोलीस पाटील, गिरीश एकनाथ पाटील, नितीन जिजाजराव सोनवणे, जीवराम सुपडू सुरवाडे, कुसूम मिलिंद गायकवाड, छाया विजय तायडे, सुनील गरबड कोळी हे सदस्य उपस्थित होते. 11 सभासद गैरहजर राहिले. तसेच राजू माळी, भरत पाटील, सागर तायडे, धनराज पाटील, रवींद्र सुरवाडे, निखील पाटील, दीपक पाटील, कुशल पाटील, जितेंद्र सोनार, सुनील पाटील, भानुदास चौधरी, योगेश सोनगीरे, कमलाकर पाटील, योगेश पाटील, अजय पाटील, सागर कोळी, झुलेलाल कोळी, सुरज पाटील, निलेश पाटील, अरविंद निकम, पुष्कर पाटील तसेच अन्नपूर्णा नगर, सम्राटनगर, सुशील नगर उपस्थितीत होते