भुसावळात आमदारांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे ; नगरसेवक पुरवणार टँकर
भुसावळ- शहराला लागून असलेल्या आरएमएस कॉलनीत तब्बल 20 वर्षांपासून मूलभूत सोयी-सुविधांसह पाणीप्रश्न सुटत नसल्याने संतप्त वयोवृद्ध नागरीकांसह महिलांनी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर सोमवारपासून उपोषण छेडले होते. उपोषणाच्या दुसर्या दिवशी मंगळवारी दुपारी आमदार संजय सावकारे यांनी उपोषणार्थींची भेट घेत चर्चा केली. आमदार निधीतून या भागात सहा लाख रुपये खर्चून पाईप लाईन टाकण्याचे तसेच नगरसेवकांद्वारे टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर उपोषणार्थींनी उपोषण मागे घेतले.
लोकप्रतिनिधींविषयी व्यक्त होता रोष
निवडणुकीत मतांचा जोगवा मागणार्या लोकप्रतिनिधींना निवडणुकीनंतर मतदारांचा सोयीस्कर विसर पडल्याचा आरोप उपोषणार्थींना केला होता तर निवडणुकीत मते मिळवण्यासाठी मतदारांची नावे सोयीस्कररीत्या मतदार यादीत टाकण्यात आली मात्र आता सत्ता मिळवल्यानंतर मतदारांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची टिकाही उपोषणार्थींनी केल्यानंतर राजकीय गोटात खळबळ उडाली होती. आमदार संजय सावकारे यांनी मंगळवारी उपोषणार्थींशी चर्चा केली. पालिका हद्दवाढीच्या प्रस्तावात या भागाचा समावेश केल्यानंतर सोयी-सुविधा मिळतील तसेच प्रांताधिकार्यांशी या भागात टँकर सुरू करण्याबाबत चर्चा केल्याचे त्यांनी उपोषणार्थींना सांगत आमदार निधीतून लवकरच पाईप लाईन टाकण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणार्थींनी उपोषण मागे घेतले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी पंचायत समिती सभापती प्रीती पाटील, उपसभापती वंदना उन्हाळे, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, नगरसेवक पिंटू कोठारी, दिनेश नेमाडे, सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, उपोषणात अॅड.अश्विनी डोलारे, शोभा दत्तात्रय तायडे, विद्या प्रकाश पाटील, संगीता लोखंडे, लता राजपूत, रेणुका पाटील, श्वेता डोलारे, संगीता राजेंद्र पाटील, कमलबाई गोमटे, आशा चौधरी, वत्सलाबाई भंगाळे, मोरेश्वर नंदा गवळी, काशीनाथ निकम, रत्नाकर जैन, सुधाकर काळे यांच्यासह प्रभागातील नागरीक व महिला मोठ्या संख्येने उपोषणात सहभागी झाले होते.