तिन्ही कारकुनांनी कोषागारात भरले साडेसात लाख

0

आर्थिक अपहारप्रकरण; तिन्ही कारकुनांचे सेवानिलंबन मागे

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या विविध विभागांमध्ये काम करणार्‍या तीन कारकुनांनी आर्थिक अपहार केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, या तिन्ही कारकुनांनी अपहाराची रक्कम महापालिका कोषागारात जमा केल्याने त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात आली आहे. परंतु, तिघांवरील खातेनिहाय चौकशी सुरूच ठेवण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे.

तिन्ही कारकुनांचे कारनामे असे
बाळू मारुती भांगे, विशाल रमेश डाबेराव आणि प्रियांका सोपान रणसिंग, अशी निलंबन रद्द केलेल्या कारकुनांची नावे आहेत. बाळू भांगे हे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. भरणा पावत्या परस्पर रद्द करून त्यांनी तीन लाख 60 हजार रुपयांचा अपहार केल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांचे 23 नोव्हेंबर 2015 रोजी सेवानिलंबन करून खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. क्रीडा विभागात कार्यरत असणार्‍या विशाल डाबेराव यांनी वाहन इंधन बिल प्रतिपूर्ती प्रकरणी तीन लाख 28 हजार रुपयांचा अपहार केल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांचे 12 जानेवारी 2017 रोजी सेवानिलंबन करून खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. प्रियांका रणसिंग या तालेरा रुग्णालयात कार्यरत असताना रोखपाल पदाच्या कामकाजात अनियमितता करून 59 हजार 900 रुपयांचा आर्थिक अपहार त्यांनी केल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांचे चार जुलै 2016 रोजी सेवानिलंबन करण्यात आले होते.

तिघांची बदली
या अपहाराची रक्कम महापालिका कोषागरात जमा करण्याबाबत तिघांनाही कळविण्यात आले होते. त्यानुसार, त्यांनी अपहार केलेली रक्कम कोषागरात जमा केली. तसेच तिघांनीही बचावासाठी केलेल्या निवेदनात आपल्यावरील दोषारोप अमान्य केल्याने त्यांची विभागीय चौकशी करणे अनिवार्य आहे. त्यानुसार 19 जुलै रोजी निलंबन आढावा समितीने तिघा कारकुनांचे सेवानिलंबन रद्द करून खातेनिहाय चौकशी पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिघांचीही त्यांच्या विभागातून बदली करण्यात आली आहे. त्यानुसार, भांगे यांची वैद्यकीय विभागातून ’ह’ क्षेत्रीय कार्यालयात, डाबेराव यांची क्रीडा विभागातून ’ह’ क्षेत्रीय कार्यालयात तर रणसिंग यांची वैद्यकीय विभागातून ’ग’ क्षेत्रीय कार्यालयात बदली करण्यात आली आहे.