मविआच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये बलात्कारीला वाचवण्यासाठी चढाओढ

0

मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड यांचे नाव पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यभरात चर्चेत आहे. पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येला मंत्री संजय राठोड जबाबदार आहे, त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी भाजपतर्फे करण्यात येत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केले आहे.

मंत्री संजय राठोड हे बलात्कारी आहेत, त्यांनी पूजा चव्हाणचा खून केला आहे, अशा बलात्कारी आणि खुनी मंत्राला मंत्रिमंडळात ठेवू नये अशी मागणी करत संजय राठोड यांच्याकडील मंत्री पद काढून घेण्यात यावे अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. दरम्यान चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बलात्कारी आणि खुनी लोकांना वाचविण्याची चढाओढ सुरु आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला ही कलंकित करणारी कृत्य आहे असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे संवेदनशील मनाचे आहे. राज्यातील जनतेच्या आणि आमच्या मनात मुख्यमंत्र्यांची छबी ही संवेदनशील अशीच आहे. ही छबी कायम राहावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्री राठोड यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.