पुणे । ‘भारत माता की जय… वंदे मातरम्’च्या घोषणांनी हातात तिरंगी ध्वज घेऊन लष्करात देशासाठी लढण्याकरीता दाखल झालेल्या वीरांगनेला अनोखी मानवंदना देण्यात आली. पारंपरिक वेशातील मुलींनी केलेले औक्षण, रांगोळीच्या पायघडया व पुष्पवृष्टीने झालेले स्वागत आणि घोषपथकासह एनसीसी, गाईडच्या गणवेशातील विद्यार्थीनींनी दिलेल्या मानवंदनेने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशप्रेमाने भारलेल्या वातावरणात त्या वीरांगनेच्या जिद्दीला सलाम करण्यात आला.
सैनिक मित्र परिवारतर्फे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सदाशिव पेठेतील रेणुका स्वरुप प्रशालेत या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी लेफ्टनंट प्रिया सेमवाल यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला ब्रिगेडीयर (निवृत्त) प्रसाद जोशी, कॅप्टन ज्योती यादव, सैनिक मित्र परिवारचे आनंद सराफ, अशोक मेहेंदळे, किशोर आदमणे, रेणुका स्वरुप प्रशाला शाला समिती अध्यक्ष डॉ.माधव भट, डॉ.मानसी भाटे, मुख्याध्यापिका जयश्री शिंदे, विजयमाला घुमे, बी.डी.शिंदे, निवेदिता मेहेंदळे आदी उपस्थित होते.
त्याग करणार्या सैनिकाचे स्मरण ठेवावे
ब्रिगेडियर जोशी म्हणाले, भारत देश विकसित देशांच्या यादीमध्ये विराजमान होत आहे. त्यामुळे देशाला पुढे नेण्याकरीता पाणी, वीज याची बचत एक नागरिक म्हणून आपण करायला हवी. त्यासोबतच प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करायला हवे, तरच पर्यावरणाचा समतोल राहील. देशासाठी त्याग करण्याकरीता प्रत्येक सैनिक तयार असतो, त्यामुळे त्यांचे स्मरण आपण ठेवायला हवे. लेफ्टनंट सेमवाल म्हणाल्या, आपण मुली आहोत म्हणून मागे राहण्याचे कारण नाही. कोणत्याही अडचणीचा वा संकटाचा सामना आपण स्वत:चा करायला हवा. साहस आणि शिक्षण या दोन गोष्टी त्यासाठी महत्त्वाच्या आहेत, ज्या आपली कधीही साथ सोडत नाहीत. त्यामुळे आकाशाकडे पहात पुढे यायचे आहे, हे एकच ध्येय लक्षात ठेवा, असे सांगत त्यांनी विद्यार्थीनींना बळ दिले.
पतीचा वारसा चालवत आहेत
सराफ म्हणाले, लेफ्टनंट प्रिया सेमवाल यांचे पती सैन्यात होते. ते 2012 मध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये लढताना शहीद झाले. त्यावेळी त्यांची मुलगी अवघी चार वर्षांची होती, तरीही परिस्थितीशी लढा देत प्रिया सेमवाल यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. आज त्या सैन्यदलात अधिकारी पदावर कार्यरत असून आपल्या पतीचा वारसा पुढे चालवित आहेत. त्यामुळे या त्यांच्या जिद्दीला सलाम करण्याकरीता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुष्पलता लाड यांनी सूत्रसंचालन केले.