रत्नागिरी । तिरंदाजी स्पर्धेदरम्यान एका स्पर्धकाच्या धनुष्यातून सुटलेला बाण राष्ट्रीय खेळाडू जुई ढगे हिच्या हातात घुसला. बाण हातात आरपार घुसल्याने जुई जखमी झाली. महाराष्ट्र राज्य आर्चरी असोसिएशन आणि रत्नागिरी जिल्हा आर्चरी असोसिएशन यांच्या विद्यामाने आयोजित सब-जुनियर गटाच्या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेला शनिवारी चिपळूण जवळील डेरवण येथे सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी स्पर्धा सुरु झाल्यानंतर एका स्पर्धकाच्या धनुष्यातून सुटलेला बाण थेट मैदानाच्या बाहेर गेला आणि ही दुर्घटना घडली.
डेरवणमधील आर्चरी स्पर्धेदरम्यान नेमकं काय झालं?
डेरवणमध्ये आर्चरी स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर, एका स्पर्धकाच्या धनुष्यातून सुटलेला बाण थेट मैदानाच्या बाहेर गेला. मैदानाबाहेरुन जाणार्या जुई ढगे हिच्या हातात बाण आरपार घुसला. जुई ढगे ही राष्ट्रीय खेळाडू आहे. बाण हातात घुसल्याने जखमी झालेल्या जुई ढगे हिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिच्यावर सध्या वालावलकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य आर्चरी असोसिएशनने हा अपघात घडल्यानंतर असोसिएशन सर्व उपाययोजना तात्काळ केल्या असून, जुई ढगे सुखरुप असल्याचे सांगितले.