तिसर्‍या रेल्वे लाईनमुळे पाचोरा तालुक्यातील नऊ गावांचा तुटणार संपर्क

Nine villages will be disconnected due to the third line between Pachora-Tarkheda पाचोरा : तिसर्‍या रेल्वे लाईनीचे काम प्रगतीपथावर असतानाच पाचोरा-तारखेडा दरम्यानच्या लाईनीमुळे तब्बल नऊ गावांचा संपर्क तुटणार असल्याची बातमी समोर आली आहे. या गावातील ग्रामस्थांचे नुकसान न होणयसाठी आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना निवेदन देण्यात आले.

शेतकर्‍यांची वाढणार गैरसोय
तारखेडा बु.॥ तारखेडा खुर्द, चिंचखेडा, गाळण (हनुमानवाडी), गाळण बु.॥ गाळण खुर्द, गाळण (विष्णूनगर), चुंचाळे, नगरदेवळा आदी गावांचा संपर्क तुटणार आहे. पाचोरा तालुक्यातील गावांला जोडणारे रस्ता बंद होणार असल्याने या गावांचा दळण-वळणाचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. भविष्यात आरोग्य सेवा वेळेत न मिळाल्यास जिवीत हानी सुध्दा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळकरी मुलांच्या प्रवासाला देखील यामुळे अडचण निर्माण होईल. 9 गावांमधून बहुसंख्य विद्यार्थी पाचोरा येथे शिक्षण घेण्यासाठी याच रस्त्याचा वापर करीत असल्याने शैक्षणिक नुकसान होऊ शकते. या गावांमधून दररोज हजारो लिटर दुध, शेतकर्‍यांचा शेतमाल तसेच अनेक बाबींच्या दळण-वळणाची खुप मोठी गैरसोय होणार आहे.

न्याय मिळण्याची शेतकर्‍यांची मागणी
आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना निवेदन देण्यात आले. समस्यांचा सारासार विचार करून सदरची मागणी संबंधीत विभागास कळवुन रेल्वे रूळा लगतच नवीन जमीन अधिग्रहण करून पर्यायी रस्त्याची तत्काळ व्यवस्था करावी आणि शासन दरबारी न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई – 32. सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार, आमदार (पाचोरा) यांना पाठविण्यात आल्या आहेत.

यांची होती उपस्थिती
या प्रसंगी तहसीलदार कैलास चावडे, निवासी नायब तहससीलदार संभाजी पाटील, सेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, जि.प.चे माजी सदस्य पदमसिंग पाटील, तालुकाप्रमुख सुनील पाटील, अनिल धना पाटील, प्रवीण ब्राह्मणे, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील यांच्यासह संबंधित गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.