जळगाव । गीतांजली केमिकल्समध्ये झालेल्या स्फोटातील तिसरा गंभीर जखमी असलेल्या योगेश प्रकाश नारखेडे यालाही मुंबई येथे हलविण्यात आले. यापूर्वी ज्ञानेश्वर उखर्डू पाटील व गणेश बन्सीलाल साळी या दोघांना मुंबई येथे हलविण्यात आले आहे. अन्य सहा जखमींवर शहरातील वेगवेगळ्या दवाखान्यात उपचार सुरु आहेत.रिअॅक्टरमध्ये दाब निर्माण झाल्यामुळे गीतांजली केमिकल्स या कंपनीत रविवारी रात्री साडे नऊ वाजता स्फोट झाला होता.
जखमींची घेतली भेट
धनराज शालिक ढाके, योगेश प्रकाश नारखेडे, निलेश ज्ञानेश्वर कोळी, गणेश बन्सीलाल साळी, अतुल सुरेश गजरे, ज्ञानेश्वर उखर्डू पाटील, दिनेश शिवशंकर मिश्रा, राजेंद्र उत्तम सपकाळे व संदीप लालचंद बोरसे हे नऊ कामगार भाजले जाऊन जखमी झाले होते. बुधवार व गुरुवारी पोलिसांनी जखमींची शहरातील दवाखान्यात जाऊन भेट घेतली. यातील दोघांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी व रतिलाल पवार यांनी गुरुवारी दोन पर्यवेक्षक व एक कामगार असे तिघांचे जबाब नोंदविले. दरम्यान, कंपनी मालकासह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झालेला असला तरी अद्याप या प्रकरणात कोणालाच अटक केलेली नसल्याची माहिती तपासाधिकारी सूर्यवंशी यांनी दिली.