तिसर्‍या दिवशी देखील उमेदवारी अर्ज निरंक

0

शिंदखेडा । नगरपंचायतीच्या निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी 21 हा तिसरा दिवस होता. तिसर्‍या दिवशी नगरसेवकपदासाठी 69 जणांनी उमेदवारी अर्ज विकत घेतले. तर नगराध्यक्षपदासाठी चार जणांनी उमेदवारी अर्ज घेतले. मात्र एकांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखलची संख्या निरंक होती. तिसर्‍या दिवसा अखेर नगराध्यक्ष पदासाठी 7 तर नगरसेवक पदासाठी 171 असे एकूण 178 अर्जांची विक्री झाली आहे. नगराध्यक्ष व 17 नगरसेवक अशा 18 जागांसाठी नगरपालिका निवडणूक होत आहे. गूरूवार आणि शूक्रवारला उमेदवारी अर्ज भरले जाणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान अर्ज विक्रीतून नगरपंचायतीच्या तिजोरीत आज अखेर 35 हजार 600 रूपये जमा झाले. शुक्रवारी अर्जाची अंतिम मुदत आहे.

निवडणूकीसाठी मोबाइल अ‍ॅप
नगरपंचायत निवडणूक आता हायटेक झाली आहे. एकीकडे निवडणूक नेते आणि त्यांचे कार्यकर्ते सोशल मिडीयाचा पूरेपूर वापर प्रचारा साठी करायला लागले आहे तर दूसरीकडे निवडणूक आयोगाने आता 2 प्रकारचे अ‍ॅप मतदारांसाठी उपलब्ध करून दिले आहे. या बाबतचे प्रशिक्षण निवडणूक नेत्यांसह कार्यकर्त्याना देण्यात आले. ट्रू वोटर मोबाईल अ‍ॅप व कॉप असे हे दोन अ‍ॅप आहेत. या अँपची माहिती मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी एक दिवसाची कार्यशाळा तहसील कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली. अ‍ॅपचा फायदा मतदारांनी घ्यावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ व सहाय्यक निवडणूक अधिकारी रोहिदास वारूडे व अजित निकम यांनी केले. निवडणूक आयोगाने नगरसेवक पदासाठी दीड लाख व नगराध्यक्ष पदासाठी चार लाख रूपये मर्यादा आखून दिलेली आहे. सर्वसाधारण जागेसाठी एक हजार व आरक्षित जागेसाठी पाचशे रूपये अनामत रक्कम निर्धरित करण्यात आली आहे. खर्चाची मर्यादा आणि रोजचा खर्च याचा ताळामेळ कसा बसवायचा या विवंचनेतही इच्छूक उमेदवार आहे.