जळगाव । शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील कलाभवन जवळ एका तीन मजली दवाखान्याचे बांधकाम सुरु आहे. याठिकाणी राजेंद्र सीताराम गोपाळ (वय 43) हे वॉचमन म्हणून काम करीत होते. दरम्यान आज शनिवारी सकाळी बांधकामावर पाणी मारत असतांना ते चक्कर येवून तिसर्या मजल्यावरून खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, त्यांना कुटूंबियांनी लागलीच तपासणीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ नेले असता वैद्यकीय अधिकार्यांनी राजेंद्र गोपाळ यांना मयत घोषित केले. अखेर याप्रकरणी वैद्यकीय अधिकार्यांनी दिलेल्या जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अन् तोल जाऊन पडले खाली
शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील कलाभवन जवळ अॅड. आर. आर. महाजन यांच्या तीन मजली दवाखान्याचे बांधकाम सुरु आहे. याठिकाणी गेल्या वर्षभरापासून राजेंद्र सीताराम गोपाळ (रा. वावळदा ) हे वॉचमन म्हणून काम करीत असून ते बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी एका खोलीत आपल्या कूटुंबीयांसोबत राहत होते. दरम्यान राजेंद्र गोपाळ हे आज सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास दवाखान्याच्या तीसर्या मजल्यावर सुरु असलेल्या बांधकामावर पाणी मारत होते. पाणी मारत असतांना त्यांना अचानक चक्कर आल्याने त्यांचा तोल जावून ते खाली पडले. यावेळी घरात स्वयंपाक करीत असलेल्या राजेंद्र यांच्या आईला खाली जोरात काही तरी पडण्याचा आवाज झाल्याने त्यांना तात्काळ खोलीतून बाहेर येवून पाहीले असता त्यांना आपला मुलगा खाली पडल्याचे दिसून आले. यावेळी तात्काळ आजूबाजूच्या रहिवाश्यांच्या मदतीने राजेंद्र गोपाळ यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता. वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मयत घोषीत केले. याप्रकरणी सीएमओ सुतार यांच्या खबरीवरुन जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वर्षभरापूर्वी आले..
राजेंद्र गोपाळ हे मूळ वावळदा येथील रहिवाशी असून ते रोजगारासाठी ते वॉचमनचे काम मिळेल त्याठिकाणी आपला कुटुंबीयांसोबत वास्तव्य करीत होते. दरम्यान सिंधी कॉलनीतील कलाभवन येथील सुरु असलेल्या दवाखान्याचे बांधकाम सुरु असल्याने गेल्या वर्षी दिवाळीमध्ये राजेंद्र गोपाळ हे कुटुंबीयांसोबत त्याठिकाणी वास्तव्य करीत होते. तसेच बांधकामावर वॉचमनची नोकरी करीत असतांना त्याठिकाणी बांधकामावर पाणी मारण्याचे काम देखील ते करीत होते. त्यांच्या पश्चात आई सुलाबाई गोपाळ, पत्नी बेबाबाई तर आनंद व चिमणराव अशी दोन मुले असा परिवार आहे.
कुटूंबियांचा रूग्णालयात आक्रोश
सकाळच्या सुमारास बांधकामावर पाणी मारत असतांना तीसर्या मजल्यावरुन राजेंद्र गोपाळ पडल्याने त्यांच्या डोक्याला मुक्कामार लागला. त्यामुळे राजेंद्र यांचा जागीच मुत्यू झाला. दरम्यान आजूबाजूला राहणार्या रहिवाश्यांच्या मदतीने त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता. त्यांना डॉक्टरांनी मयत घोषीत केले. यावेळी कुटूंबीयांसह नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. तर यावेळी नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.