इस्लामाबाद: पाकिस्तानच्या खेळाडूंना मात्र विराट कोहलीच्या चांगल्या कामगिरीमुळे खुपत असल्याचे चित्र आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या दमदार फॉर्मात आहे. फलंदाजीसोबतच कोहलीने आपले नेतृत्त्व गुण देखील सिद्ध करून दाखवले आहेत. पण या कामगिरीचे पाक खेळाडूंना वावडेच असल्याचे दिसते. पाकिस्तानच्या फलंदाज उमर अकमल याने आपली तुलना कोहलीसोबत करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. उमर अकमलकडून गेल्या काही सामन्यांमध्ये अपेक्षित कामगिरी होत नसल्यामुळे तो टीकेचा केंद्रबिंदू झाला आहे. यावर स्पष्टीकरण देताना अकमलने आपल्या फलंदाजी क्रमवारीवर खापर फोडले. खालच्या स्थानावर फलंदाजी केल्यामुळे खेळपट्टीवर खूप कमी वेळ मिळतो, असे अकमलने सांगितले.
विराटची तुलना बाबर आझमशी !
नुकतेच अकलमला एका स्थानिक सामन्यात ४२ चेंडूत ६६ धावांची खेळी साकारली होती. पण ऐनवेळी अकमलने विकेट टाकली आणि संघाला विजयापासून वंचित रहावे लागले होते. अकमलला रोषाला सामोरे जावे लागले. यावरून अकमलला कोहलीच्या सातत्यपूर्ण खेळीचा संदर्भ देऊन प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अकमलचा संताप झाला. कोहलीसारखा तू यशस्वी खेळी का साकारत नाहीस? असा प्रश्न अकमलला विचारण्यात आला होता. कोहलीसोबत माझी तुलना करणे योग्य नाही. तो संघात तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला येतो, तर मी खालच्या क्रमाकांवर फलंदाजी करतो याचा विचार करा. मला संघात तिसऱ्या स्थानावर खेळायला द्या आणि विराटला सहाव्या, त्यानंतर आमची तुलना करा, असे वक्तव्य उमर अकमल याने केले. विराटची तुलना तुम्ही आमच्या संघातील बाबर आझम याच्याशी करू शकता, कारण तो संघात तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला येतो. बाबर आझम सध्या दमदार फॉर्मात आहे.