तिहेरी तलाकच्या चर्चेआधी राफेलवरून गदारोळ; लोकसभेचे कामकाज काही वेळासाठी तहकूब

0

नवी दिल्ली-आज लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा होणार आहे. दरम्यान सकाळी कामकाजाची सुरुवात होताच काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी राफेल करारावरुन चर्चेची मागणी करत गदारोळ केला. यामुळे लोकसभेचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभा देखील विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु असून तिहेरी तलाक बेकायदा ठरवणारे नवे विधयेक केंद्र सरकारने लोकसभेत सादर केले होते. या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. हे विधेयक मंजूर व्हावे, यासाठी भाजपाने व्हीप जारी केला आहे. काँग्रेसनेही व्हीप जारी केला आहे.

संसदेबाहेर बोलतांना काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी या विधेयकावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली. ‘काँग्रेस या विधेयकावर चर्चा करण्यास तयार आहे, पण सरकारने धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करु नये’, असे त्यांनी सांगितले. ११ वाजता कामकाजाला सुरुवात होताच मल्लिकार्जून खरगे यांनी राफेल करारावर चर्चेची मागणी लोकसभा अध्यक्षांकडे केली. पण याबाबत १२ वाजता बोलण्याची संधी देऊ, असे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितले. यानंतर काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांचे खासदार आक्रमक झाले. ‘राफेल’प्रकरणी जेपीसीची मागणी त्यांनी केली.