‘मन की बात’मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
नवी दिल्ली : मुस्लीम महिलांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणणारी तिहेरी तलाक प्रथा बंद केल्यानंतर आता हज यात्रेसाठी मुस्लीम महिलांना आवश्यक असलेल्या ’मेहरम’ची प्रथादेखील भारत सरकारने बंद केली आहे. त्यामुळे यापुढे मुस्लीम महिलांना स्वतंत्रपणे हज यात्रा करता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या ’मन की बात’ या कार्यक्रमात सरकारने घेतलेल्या या नव्या निर्णयाची माहिती दिली. तसेच, नवीन भारतातील युवापिढी ऊर्जावान आहे. 18 ते 25 वर्षे वयोगटातील युवक हे खूप ऊर्जावान आणि संकल्पपूर्ण असल्यामुळे नवीन भारताची धुरा याच युवापिढीच्या खांद्यावर आहे, अशी भावनाही मोदींनी याप्रसंगी व्यक्त केली.
नवमतदारांचे मोदींकडून स्वागत
ज्या मुला-मुलींचा 21 व्या शतकातील जन्म आहे म्हणजेच 2000 सालचा जन्म आहे; ते जानेवारी 2018 पासून वयाच्या 18 व्या वर्षात पदार्पण करणार आहेत, त्यामुळे ते मतदानासाठीही पात्र ठरणार असल्याचे यावेळी मोदींनी सांगितले. तसेच या भारताच्या नवीन मतदारांचे त्यांनी स्वागतही केले. 18 ते 25 वयोगटातील युवकांसाठी भारतातील प्रत्येक जिल्ह्यात संसदीय सभा आयोजित करु शकतो का, असा प्रश्नही मोदीं उपस्थित केला. संसद सभा यासाठी की हे युवक या सभेत नवभारतासाठीच्या संकल्पनांवर विचारमंथन करु शकतील किंवा विविध योजनांच्या आधारे आपण आपल्या संकल्पांना 2022 च्या आधीच पूर्ण करु शकू. म्हणजेच यातून आपल्या स्वातंत्र्यसेनानींनी पाहिलेल्या त्यांच्या स्वप्नातील भारत आपण साकार करु शकू, असेही मोदी म्हणाले.
भारतीय मुस्लीम महिला अधिक सक्षम होतील!
मोदी म्हणाले, की भारतामध्ये गेल्या 70 वर्षांपासून ’मेहरम’ ही प्रथा सुरु होती. या प्रथेनुसार भारतातील एखाद्या मुस्लीम महिलेला हज यात्रा करण्याची इच्छा असेल तर तिला तिच्यासोबत एखादा पुरुष रक्षक अर्थात मेहरम सोबत घेऊन जाणे बंधनकारक होते. त्यामुळे इच्छा असूनदेखील अनेक मुस्लीम महिलांना हज यात्रा करता येत नव्हती. विशेष म्हणजे, भारत वगळता इतर सर्व देशांमध्ये ही प्रथा अमान्य आहे, परंतु भारतामध्ये गेल्या अनेक दशकांपासून ही प्रथा सुरु होती. त्यामुळे भारत सरकारने यावर कारवाई करत ही प्रथा नष्ट करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली व ही प्रथादेखील आता नष्ट केली आहे. त्यामुळे भारतातीलदेखील मुस्लीम महिला आता यापुढे स्वतंत्रपणे हज यात्रा करू शकतात, असे मोदींनी सांगितले. तसेच सरकारच्या या निर्णयानंतर संपूर्ण देशभरातून 1300 हून अधिक मुस्लीम महिलांनी पुढील वर्षीच्या हज यात्रेसाठी आपली नावनोंदणी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. देशातील हा सकारात्मक बदल अत्यंत महत्त्वाचा असून यामुळे भारतीय मुस्लीम महिला अधिक सक्षम होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रजासत्ताकदिनाला 10 देशांचे पाहुणे
जनतेशी संवाद साधताना मोदी म्हणाले, की मला नुकतेच समजले की एखाद्या मुस्लीम महिलेला हज यात्रेस जायचे असल्यास तिला पुरूष सदस्याची गरज भासते. अन्यथा तिला यात्रेस जाता येत नाही. हा भेदभाव पाहून मला आश्चर्य वाटले. हा नियम म्हणजे त्यांच्यावर अन्याय आहे. त्यामुळे या नियमात बदल करून त्यांना एकट्याने हजला जाण्यास परवानगी देण्यात आली असून, यावर्षी 1300 मुस्लीम महिलांनी पुरूषांविना हजला जाण्यासाठी अर्ज केला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी लोकसभेत तलाकविरोधातील विधेयक मंजूर करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आशियाई देशातील 10 नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच, येत्यावर्षी देशभरात स्वच्छतेबाबत सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.
राहुल गांधींनी मोदीभक्तांना फटकारले
मोदी भक्तांनो, तुमच्या नेत्यांना केवळ पोकळ घोषणा देण्यापेक्षा गरजेच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायला सांगा, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. राहुल यांनी रविवारी ट्वीटर शेअर केलेल्या एका व्हिडिओसोबत हा संदेश लिहला आहे. चीन भारतासमोर स्पर्धा निर्माण करत असताना तुमचे नेते केवळ पोकळ घोषणाच देत आहेत. त्यामुळे कृपया हा व्हिडिओ बघा आणि मोदींना रोजगारनिर्मितीसारख्या आवश्यक गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला सांगा, असे राहुल यांनी म्हटले. याशिवाय, राहुल गांधींनी मोदींच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेतील त्रुटीही अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.