तिहेरी तलाकवर काहींचे मौन का?

0

नवी दिल्ली : तोंडी तलाक’च्या मुद्यावर काही जणांनी पाळलेले मौन पाहून आश्‍चर्य वाटते, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली आहे.

माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यावर लिहिल्या गेलेल्या एका पुस्तक प्रकाशन समारंभावेळी आदित्यनाथ यांनी हे मत व्यक्त केले. तोंडी तलाकविरुद्ध प्रत्येकाने भूमिका घेणे आवश्यक आहे. चंद्रशेखरसुद्धा समान नागरी कायद्याच्या बाजुनेच होते. तोंडी तलाकच्या मुद्यासंदर्भात मौन पाळणारेही दोषीच आहेत, अशी टीका आदित्यनाथ यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाकडून सध्या तोंडी तलाकच्या प्रथेची घटनात्मक वैधता तपासण्यात येत आहे. केंद्र सरकार व काही स्वयंसेवी संस्थांकडून तोंडी तलाकची ही प्रथा लैंगिक समानतेच्या विरोधात असल्याची भूमिका न्यायालयात मांडण्यात आली आहे. मात्र, सरकारच्या या भूमिकेस ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने व इतर काही महत्त्वपूर्ण मुस्लिम मौलवींनी ठाम विरोध दर्शविला आहे. तोंडी तलाकला मुस्लिमांचा पवित्र धर्मग्रंथ असलेल्या कुराणची मान्यता असून, यामुळे हा विषय न्यायालयाच्या मर्यादेमध्ये येत नाही. तोंडी तलाक घटनात्मकदृष्ट्या अवैध ठरविणे म्हणजे कुराणचे पुनर्लेखन केल्यासारखे असल्याचा इशारावजा दावाही मुस्लिम बोर्डाने केला आहे.

या पार्श्‍वभूमीवर आदित्यनाथ यांच्या विधानांना महत्त्व दिले जात आहे. आपला देश एक आहे. मग या देशात समान नागरी का नसावा, असा प्रश्‍नही त्यांनी केला. तसेच, तिहेरी तलाकमुळे मुस्लिम महिलांची कुचंबणा होत असून, त्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळेच समान नागरी कायदा महत्त्वाचा आहे. समान नागरी कायद्यासाठी चंद्रशेखरही अनुकूल होते, असा दावाही आदित्यनाथ यांनी केला आहे,