सहारनपूर । तिहेरी तलाक बंद करावा यासाठी एका मुस्लीम महिलेने पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. या महिलेचे नाव शगुफ्ता शाह असून, या महिलेला मुलगा न झाल्यामुळे तिच्या नवर्याने तलाक दिला होता. उत्तर प्रदेशातील निवडणुकांदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिहेरी तलाक पद्धत बंद करण्याचे आश्वासन दिलं होते. आता उत्तर प्रदेशात योगी सरकार आल्यापासून मुस्लिम महिलांनी तिहेरी तलाक पद्धत बंद करण्यासाठी थेट मोदींकडे पत्रव्यवहार करण्यास सुरुवात केली आहे.
शगुफ्ता ही सहारनपूरची रहिवासी आहे. तिला या आधी दोन मुली झाल्या आहेत. शगुफ्ता तिसर्यांदा गर्भवती राहिल्यावर, तिचा पती शमशाद सईद याने गर्भपात करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. मात्र शगुफ्ताने गर्भपात करण्यास नकार दिल्यावर तिला बेदम मारहाण करण्यास सुरुवात झाली. एक दिवस तिला मारहाण करून घरातून बाहेर काढण्यात घरातून बाहेर काढल्यानंतर शगुफ्ताने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी तिची कोणतीही मदत केली नाही असा आरोप तिने केला आहे. शगुफ्ताच्या आधी सहारनपूरच्याच अतिया साबरी या महिलेने तिहेरी तलाक प्रथेविरोधात मोदींना चिठ्ठी लिहिली होती. तिहेरी तलाक ही प्रक्रिया शरिया कायद्यानुसार चालणारी प्रक्रिया आहे. यात पतीला तीन वेळा तलाक बोलून पत्नीशी घटस्फोट घेता येतो. महत्त्वाचे म्हणजे मुस्लिम बहुल देश असलेल्या पाकिस्तान आणि इंडोनेशिया या देशांमध्ये हा कायदा आधीच हटवण्यात आला आहे. तर भारतात हा कायदा अद्याप सुरू आहे.