तिहेरी तलाकविरोधी विधेयक सोमवारी राज्यसभेत

0

केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांची माहिती

नवी दिल्ली : लोकसभेमध्ये बहुमताने पारित झालेले ’द मुस्लीम वूमन (प्रोटेक्शन ऑफ राईट ऑन मॅरेज)’ विधेयक येत्या सोमवारी राज्यसभेमध्ये मांडण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांनी दिली. त्यामुळे राज्यसभेतील सर्व खासदारांनीदेखील या विधेयकाला मान्यता देऊन ते बहुमताने पारित करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

राज्यसभेनेही मान्यता द्यावी!
भारतीय राज्यघटनेनी देशातील सर्व नागरिकांना काही मुलभूत अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे त्यांचे रक्षण करणे हे सरकारचे आणि लोकप्रतिनिधींचे आद्य कर्तव्य आहे. भारत सरकारने तिहेरी तलाक संबंधी नवा कायदा अस्तिवात आणून एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून, लोकसभेतील सर्व नेत्यांनी याला मान्यता देऊन या ऐतिहासिक निर्णयात आपला सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे आता राज्यसभेतील नेत्यांनीदेखील या विधेयकाला बहुमताने मान्यता द्यावी, असे आवाहन अनंतकुमार यांनी केले आहे.

मुस्लीम महिलांत देशभर आनंद
विरोधकांचा गदारोळ आणि विरोधानंतर अखेर काल तिहेरी तलाकसंबंधीचे विधेयक लोकसभेत मंजूर झाले. लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर देशभरातील मुस्लीम महिलांनी या विषयी आनंद व्यक्त केला. या नव्या कायद्यानुसार तिहेरी तलाक ही प्रथा भारतात बेकायदेशीर ठरवली जाणार असून, या प्रथेचा वापर करून मुस्लीम महिलांच्या मुलभूत हक्कांवर गदा आणणार्‍यांना कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार न्यायव्यवस्थेला मिळणार आहेत. त्यामुळे राज्यसभेत यावर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.