नवी दिल्ली । रामाचा जन्म हा हिंदुची धार्मिक आस्था समजला जातो. तर 1400 वर्षांची परंपरा असलेला तिहेरी तलाक गैरइस्लामी आहे, घटनाबाह्य कसा ठरू शकतो? असा सवाल मुस्लीम पसर्नल लॉ बोर्डाचे वकील, माजी कायदेमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी तिहेरी तलाकवर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयात विचारला. तिहेरी तलाक हा आस्थेचा विषय असल्याने न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करू नये, असेही सिब्बल म्हणाले.
मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, इस्लामध्ये ई तलाक आणि व्हॉटसअॅपद्वारे दिलेल्या तलाकाचे नक्की स्थान काय, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने मुस्लीम पसर्नल लॉ बोर्डाला विचारला. त्यावेळी बोर्डाची बाजू न्यायालयासमोर मांडताना सिब्बल यांनी अनेक मुद्दे मांडले. या दरम्यान त्यांनी तिहेरी तलाकाची तुलना राम जन्माशी केली. सिब्बल म्हणाले की, तिहेरी तलाक या मुस्लिमांच्या आस्थेचा प्रश्न आहे. अयोध्येत प्रभू रामचंद्राचा जन्म झाला अशी हिंदुची आस्था आहे. कोणीच आक्षेप घेत नाहीत मग तिहेरी तलाकबाबत प्रश्न का विचारला जातो? तिहेरी तलाक अमान्य झाल्यास नवीन कायदा आणण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेबाबतही सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केले.
तिहेरी तलाक धार्मिक
तलाक देण्याच्या मुद्द्यावरून मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने मुस्लीम पसर्नल लॉ बोर्डाला अनेक प्रश्न विचारले. यावेळी ई तलाक आणि व्हॉट्सअॅप वरून दिल्या जाणार्या तलाकाविषयी माहिती करून घ्यायची आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, तिहेरी तलाक हा धार्मिक मुद्दा आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करून नये असे मुस्लीम पसर्नल लॉ बोर्डाने सांगितले.
हुंड्याची प्रथा चालते…
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान कपिल सिब्बल यांनी तिहेरी तलाकाची बाजू मांडताना हिंदूमधील अनेल प्रथांची उदाहरणे दिली. हिंदुमधील या प्रथांविरुद्ध कायदे असूनही त्या चालू शकतात तर मग तिहेरी तलाक का नाही? असा युक्तिवाद त्यांनी यावेळी केला. हिंदुमधील हुंडा घेण्याच्या प्रथेविरुद्ध कायदा आहे. पण प्रथा म्हणून हुंडा घेतला जातो. मग मुस्लिमांमध्ये 1400 वर्षांची प्रथा असताना तिहेरी तलाकला विरोध का? असा मुद्दा त्यांनी मांडला.