नवी दिल्ली : तिहेरी तलाकच्या मुद्द्याकडे राजकीय चष्म्यातून पाहू नका. मुस्लीम समाजातील बुद्धिजीवी घटकांनी या मुद्द्यावर लोकांच्या प्रबोधनासाठी पुढे यायला हवे. स्त्रीयांना त्यांचे हक्क द्यावे लागतील. व्यवस्थेतील कमजोरी दूर करून मुलींना वाचवावे लागेल. तिहेरी तलाकविरुद्ध मुस्लीम समाजातील प्रत्येकाने पुढे आले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केले. महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते. तिहेरी तलाकप्रकरण सद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी असून, संविधानपीठ त्यावर निर्णय घेणार आहे. लवकरच याप्रकरणी अंतिम निर्णय दिला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे हे विधान अत्यंत महत्वपूर्ण मानले जात आहे. तिहेरी तलाक प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही या सरकारच्यावतीने नुकतीच उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत देण्यात आली होती.
मुलींना वाचवावे लागेल, स्त्रीयांना हक्क द्यावे लागतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की मुस्लीम महिला तिहेरी तलाकच्या विरोधात आहेत. या समाजातील काही बुद्धिजीवी लोकं, सुज्ञ नागरिक याप्रश्नी पुढे आले तर मुस्लीम समाजातील मुलींवर, स्त्रीयांवर जे बेतले जात आहे, त्यातून त्यांची सुटका करणे शक्य होईल. अशाप्रकारचे चांगले पाऊल उचलून आपण जगभरातील मुस्लीमांसाठी एक आदर्श प्रस्तूत करू. महात्मा बसवेश्वर यांनी ज्याप्रमाणे स्त्री-पुरुष समानतेचा मार्ग दाखविला. जगाला आधुनिकतेकडे घेऊन गेले. त्याप्रमाणे आपणदेखील स्त्रीयांना त्यांचे हक्क देऊन आत्मनिर्भर करू या, असे आवाहनही मोदींनी केले. तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर आता चर्चा सुरुच झाली आहे तर भारताची गौरवशाली परंपरा पाहाता, आपण सर्वमिळून ही चुकीची प्रथा मोडित काढू, असेही मोदींनी सूचित केले. तब्बल 40 मिनिटांच्या भाषणात मोदींनी तिहेरी तलाकमुळे निर्माण झालेल्या समस्यांचा उहापोह केला. ही आपल्या देशाच्या मातीची ताकद आहे की, मुस्लीम नागरिकही माता-भगिनींना वाचविण्यासाठी नक्कीच पुढे येतील, असा विश्वासही याप्रसंगी मोदींनी व्यक्त केला.
तिहेरी तलाक प्रकरण संविधान पीठाकडे!
तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर कुणीही राजकारण करू नये. समाजानेच या मुद्द्यावर आता विचार करावा व मार्ग काढावा. भारताचा इतिहास केवळ पराभप, गुलामगिरी, गरिबी किंवा साप-मुंगसाच्या लढाईचा नाही. तर भारताने सत्याग्रह, गूड गव्हर्नन्सचा संदेशही जगाला दिलेला आहे. कोणत्याही मुद्द्यावर मतभेद जरुर असतील. परंतु, आपण चर्चेतून ते मतभेद सोडवू. तिहेरी तलाकप्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही माता-भगिनींना न्याय देऊ इच्छितो. न्यायसंस्थेचा येईल तो निर्णय सर्वांना मान्य असेल, अशी अपेक्षाही मोदींनी व्यक्त केली. सद्या तिहेरी तलाकचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानपीठाकडे आहे. त्यावर तातडीने सुनावणीस न्यायालयाने मंजुरी दिलेली असून, लवकरच याबाबत अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे.