तिहेरी हत्याकांडाने कुरकुंडी हादरले!

0

चाकण :खेड तालुक्यातील कुरकुंडी येथील रहिवासी असलेल्या गोगावले कुटुंबातील तिघांची तीक्ष्ण हत्याराने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. रोहिदास बाळू गोगावले (वय 45), त्यांची पत्नी मंदा रोहिदास गोगावले (वय 40) व मुलगी अंकिता रोहिदास गोगावले (वय 12, तिघे रा. कुरकुंडी, ता. खेड) अशी हत्या झालेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचे मृतदेह आरोपींनी शेतातच पुरले होते. कौटुंबीक वाद किंवा संपत्तीच्या वादातून हे हत्याकांड झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान, ही घटना उजेडात आल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक तपासाअंती मयत रोहिदास गोगावले यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा दीपक रोहिदास गोगावले (वय 22, रा. कुरकुंडी) यास संशयित आरोपी म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी संशयित दीपक व त्याच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

मुलानेच जन्मदात्याला संपवले
संशयित आरोपी दीपक हा मयत रोहिदास गोगावले यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. कौटुंबीक वाद किंवा संपत्तीच्या वादातून त्याने घरातीलच अन्य व्यक्ती किंवा साथीदारांच्या मदतीने वडिल, सावत्र आई व लहान बहिणीची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपींनी तिघांची हत्या केल्यानंतर तिघांचे मृतदेह घराशेजारी असलेल्या शेतातच पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती होताच, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सुवेझ हक, अपर पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे, खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राम पठारे, चाकणचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, उपनिरीक्षक महेश मुंडे हे कर्मचार्‍यांना घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली.

सुरुवातीला आढळले दोन मृतदेह
सुरुवातीला मयत रोहिदास गोगावले व त्यांच्या पत्नी मंदा गोगावले यांचे मृतदेह आढळून आले. तर त्यांची मुलगी अंकिता हिचा मृतदेह आढळून आला नव्हता. त्यामुळे ती बेपत्ता झाल्याचा संशय होता. परंतु, गोगावले दाम्पत्याचे मृतदेह जमिनीतून उकरून काढत असताना त्याच ठिकाणी खाली अंकिता हिचादेखील मृतदेह नंतर आढळला. या घटनेविषयी पोलिसांनी गोगावले यांच्या नातेवाईकांची कसून चौकशी केली. त्यात दीपक हा उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला. म्हणून त्याला ताब्यात घेण्यात आले. मात्र, हत्याकांडाचे ठोस कारण अद्यापही समोर आलेले नसल्याने पोलिसांकडून गोगावले यांच्या इतर नातेवाईकांचीदेखील कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, या हत्याकांडाने संपूर्ण खेड तालुका हादरला आहे.