तीनच अधिकार्‍यांवर आयुक्त मेहरबान!

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेचे भांडार विभागाचे सहायक आयुक्त प्रवीण आष्टीकर, मुख्य लेखापाल राजेश लांडे आणि मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण यांच्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर चांगलेच ‘मेहरबान’ आहेत. आष्टीकर यांच्याकडे अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार दिला असून गहापालिकेची सर्व खरेदीही दिली आहे. तर लांडे व पोमण यांना परदेश दौर्‍यावर पाठविले आहे.

आष्टीकर यांच्या विभागावर खरेदीत गोलमाला झाल्याचे वांरवार आरोप झाले आहेत. कचर्‍याच्या कंटेनर खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, सत्ताधारी भाजपच्याच सरचिटणीसाने केला होता. आषाढीवारीतील वारकर्‍यांना देण्यात येणार्‍या ताडपत्री खरेदीत देखील गैरव्यवहार झाल्याचा आरोप, विरोधकांनी केला होता. तसेच जात प्रमाणपत्रावेळी भाजप नगरसेवकांना अनुकूल अशी भूमिका आष्टीकर यांनी घेतली होती. त्यावरुन देखील त्यांच्यावर विरोधकांनी आरोप केले होते. अशा विविध कारणांनी आष्टीकर वादग्रस्त ठरले असताना आयुक्त पुन्हा त्यांच्यावर ’मेहरबान’ झाले आहेत. महापालिकेची सर्व खरेदी आष्टीकर यांच्याकडे दिली आहे. वैद्यकीय विभाग स्वतंत्र होता. आयुक्तांनी तोही आष्टीकर यांच्या अखत्यारित आणला आहे. तसेच पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार देखील त्यांच्याकडे देण्यात आला आहे. वादग्रस्त ठरलेल्या अधिकार्‍याला आयुक्त पाठबळ देत असल्याने इतर अधिकार्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे.

पोमण यांची पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीच्या सह मुख्यकार्यकारी अधिकारीपदी निवड केली आहे. यासाठी आयुक्तांचीच शिफारस आहे. त्याचबरोबर पोमण यांना मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी असे संबोधण्यास तसेच त्यांना सहायक आयुक्तपदाचा दर्जा देण्यास आणि विभागाचा विभागप्रमुख म्हणून मान्यता देण्यात आली. ज्या दिवशी विभागप्रमुख म्हणून घोषित केले. त्याच दिवशी त्यांना ’फिलिपाईन्स’ दौर्‍यावर पाठविले.

लांडे हे ठेकेदारांची बीले देण्याच्या मोबदल्यात पैसे मागत असल्याचे आरोप झाले होते. त्याची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर गेली होती. त्यामुळे पालिकेत आणि शहराच्या राजकारणात मोठा ’गहजब’ झाला होता. लांडे यांनी पालिकेतील अधिकारी, कर्मचार्‍यांना दिवाळीत देण्यात येणारा ’बोनस’ अडविला होता. त्यावर कर्मचारी महासंघाने आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर आयुक्तांनी बोनस दिला. मात्र, लांडे यांनी स्वत: बोनस नाकारला होता. बोनस नाकारलेले लांडे आता मात्र परदेश दौर्‍यावर कसे गेले, अशी चर्चा पालिकेत रंगली आहे.