जळगाव– अवैधधंद्ये तसेच अवैध धंदे व्यावसायिकांशी सलगीवरुन कारवाई म्हणून नियंत्रण कक्षात जमा होण्याची एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या मनोज सुरवाडे या कर्मचार्यावर हॅट्रट्रीक साधली. तीनदा वरिष्ठांकडून कारवाईनंतरही सुधारणा झाली नाही. विशेष म्हणजे नियंत्रण कक्षात जमा असतांनाही सुरवाडे याचा आर.के.वाईन्स अवैध मद्य विक्री प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले. त्यामुळे या कर्मचार्यावर या प्रकरणात कठोर कारवाईची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. हा कर्मचारी कार्यरत असलेल्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षकालाही आर.के. वाईन्स प्रकरण अंगलट येणार असून त्यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
काय आहे नेमके प्रकरण
लॉकडाऊनमधील अवैध दारुची विक्री करणारे आर.के.वाईन्सवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अहवाल पाठविल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी आर.के.वाईन्सचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला. या मद्यप्रकरण काही पोलीस कर्मचारीही सहभागी असल्याने तसेच त्याचे धागेदोर पाहता जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी प्रकरणाच्या मूळाशी जावून नेमकी सत्यता जाणून घेण्यासाठी चौकशीसाठी अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटीची नियुक्त केले
या कर्मचार्यांचे नोंदिवले जबाब
आर.के.वाईन्स अवैध मद्य प्रकरणाशी संबंध जोडलेले एमआयडीसीचे कर्मचारी दीपक चौधरी, रवींद्र चौधरी, आर्थिक गुन्हे शाखेचे जीवन काशिनाथ& पाटील, जिल्हा पेठचे संजय जगन्नाथ जाधव, जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे भरत शांताराम पाटील व मुख्यालयाचे मनोज सुरवाडे या कर्मचार्यांचा जबाब नोंदविण्यात आलेला आहे. त्याशिवाय विजय नेरकर, जितेंद्र राजपूत व रवी नरवाडे या तीन कर्मचार्यांकडूनही काही माहिती जाणून घेण्यात आली. चौकशीत आणखी काही लोकांची नावे निष्पन्न होत असून अनेक पोलीस रडारवर आलेले आहेत. यात पोलीस निरिक्षकासह एका कर्मचार्याचीही भागीदारी असल्याचे समोर येत असून त्यादृष्टीने पुरावे गोळा करण्याचे काम सुरु झाले आहे.
पोलीस निरिक्षकासह कर्मचार्याची भागीदार उघड
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विभागाकडून कारवाईत एक करारनामा आढळून आला. त्यानुसार पोलीस निरिक्षक यात भागीदार असल्याचे उघड झाले आहे. आर.के.वाईन्सचा मालक व संबंधित निरिक्षक संपर्कात होते, त्यांची व्हॉईस कॉल रेकार्डिंगही जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक तक्रारी असूनही संबंधित कुठलीही कारवाई न झालेल्या पोलीस निरिक्षकाला आर.के.वाईन्स प्रकरण चांगलेच अंगलट येणार असून कठोर कारवाईची शक्यता आहे. पोलीस निरिक्षकाबरोबरच काही दिवसांपूर्वी त्याच पोलीस ठाण्यात कार्यरत (सध्या नियंत्रण कक्षात) असलेल्या कर्मचार्याचीही आर.के.वाईन्समध्ये भागीदारी असल्याची माहिती आहे. आधीच अवैधधंद्याशी सलगीमुळे तीनदा कंट्रोल जमा कर्मचार्यावर वरिष्ठांकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. याबरोबरच इतर पोलीस कर्मचार्यांवरीही कारवाई टांगली तलवार कायम आहे.
तीन कर्मचार्यांवर यापुर्वीच गंभीर गुन्हे दाखल
आर के वाईन्स मद्य प्रकरणात एसआयटीने जबाब नोंदवलेल्या कर्मचाऱ्यांपैकी तीन कर्मचाऱ्यांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात जिल्हापेठच्या संजय जाधव यांच्यावर भादवि ३७६ प्रमाणे” सावदा पोलीस ठाण्यात , जीवन पाटील विरोधात प्राणघातक हल्लाप्रकरणी रामानंद पोलीस ठाण्यात तर मनोज सुरवाडे विरोधात तालुका पोलीस ठाण्यात काही वर्षापुर्वी गाजलेल्या दादावाडी लॉजप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे याप्रकरणात लवकरच मोठा गौप्यस्फोट होणार असुन कारवाईचा मोठा बॉम्ब फुटणार आहे.