मुंबई : ठाणे जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात गुरुपौर्णिमेला गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांना आदरांजली वाहिली जाते. धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानाच्या वतीने या वर्षी ठाणे येथे श्री मावळी मंडळाच्या सभागृहात ३०० हातांना एकत्रित करून समाजकारणाची एक आगळी वेगळी “गुरुदक्षिणा” गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांना अर्पित करण्यात आली. धर्मवीरांच्या समाजकारणाचा वारसा पुढे चालविणारे त्यांचे पुतणे केदार दिघे यांनी गुरुपौर्णीमेचे औचित्य साधून शिक्षण, आरोग्य , पर्यावरण , महिला सबलीकरण, रोजगार , शहर स्वछता , अध्यात्म व प्रबोधन अशा आठ समित्यांची सुरुवात आज ठाणे शहरामधून केली आहे. समाजकारणाची आवड असलेल्या दीडशे हुन अधिक कार्यकर्ते या कार्यक्रमास हजर होते. आजच्या युवा पिढीची क्रयशक्ती देशहितासाठी कशा प्रकारे वापरू शकतो व यामध्ये गुरूचा प्रभाव काय असतो यावर मार्गदर्शन करण्यासाठी लक्ष फाऊंडेशनच्या संस्थापिका वीरमाता अनुराधा गोरे यांना खास निमंत्रित केले होते. या कार्यक्रमात बोलताना वीरमाता अनुराधा गोरे म्हणाल्या , आजमितीला तंत्रज्ञान कितीही विकसित झाले असले तरी संस्कारांची झोळी भरण्यासाठी आपल्या सर्वाना गुरुची साथ हवीच असते. आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून संपूर्ण भारतामध्ये पोहचविणे ही सध्याची गरज असली तरी आजची युवा पिढी त्या तंत्रज्ञानाच्या आहारी जाणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. आपण राहत असलेल्या समाजाविषयी जर तुम्हाला आत्मीयता असेल तरच तुम्ही खऱ्या अर्थाने या देशाचे नागरिक बनाल. केदार दिघे यांनी सुरु केलेल्या या समाजपयोगी कार्यास माझा पाठींबा सदैव राहील.
या कार्यक्रमात बोलतांना केदार दिघे म्हणाले, “धर्मवीरांना जाऊन १६ वर्षे झाली असली तरी त्यांच्या शिष्यांची संख्या रोज वाढत आहे. स्वतः चे घरदार सोडून कोणताही स्वार्थी हेतू मनात न ठेवता ३६५ दिवस जनतेसाठी कार्यरत असणाऱ्या धर्मवीरांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने समस्त ठाणेकरांतर्फे “गुरुदक्षिणा” अर्पण करीत आहे. या समित्या संपूर्णपणे ठाणे शहरवासीयांसाठी कार्यरत असणार असून यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप असणार नाही.” या कार्यक्रमाला नाशिक , कोल्हापूर सातारा , कोकण, पालघर, मुंबई, नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातून धर्मवीरांचे अनुयायी आले होते.