ठाणे | धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानाच्यावतीने रविवारी, गुरूपौर्णिमेनिमित्त येथील मावळी मंडळ सभागृहात ३०० हातांना एकत्रित करून समाजकारणाची एक आगळी वेगळी “गुरुदक्षिणा” गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांना अर्पित करण्यात आली. सर्वसामान्य ठाणेकरांच्या सेवेत शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सबलीकरण, रोजगार, शहर स्वछता, अध्यात्म व प्रबोधन अशा आठ समित्यांची सुरुवात या कार्यक्रमातून केली गेली. या समित्यात कोणत्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप असणार नाही. ठाणे जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात गुरुपौर्णिमेला गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांना आदरांजली वाहिली जाते. यंदाही नाशिक, कोल्हापूर, सातारा, कोकण, पालघर, मुंबई, नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातून धर्मवीरांचे अनुयायी व समाजकारणाची आवड असलेले असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. प्रमुख पाहुण्या, लक्ष्य फाऊंडेशनच्या संस्थापिका वीरमाता अनुराधा गोरे यांनी आजच्या तंत्रज्ञानाच्या गर्दीत गुरुचे महत्व अबाधित ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले.
धर्मवीरांना जाऊन १६ वर्षे झाली असली तरी त्यांच्या शिष्यांची संख्या रोज वाढत आहे. स्वतः चे घरदार सोडून कोणताही स्वार्थी हेतू मनात न ठेवता ३६५ दिवस जनतेसाठी कार्यरत असणाऱ्या धर्मवीरांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने समस्त ठाणेकरांतर्फे आम्ही ही अनोखी “गुरुदक्षिणा” अर्पण केली आहे.
– केदार दिघे,
आनंद दिघे यांचे पुतणे, वारसदार
‘मातोश्री’वर गुरुपौर्णिमा सुनी-सुनी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असतांना गुरुपौर्णिमेला राज्यभरातील हजारो शिवसैनिकांच्या उत्साही गर्दीने फुलून निघणारा मातोश्री बंगला यंदा सुना-सुना होता. तिथे नेहमीप्रमाणे शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांची गर्दी यंदा पाहायला मिळाली नाही. अगदीच तुरळक शिवसैनिक ‘मातोश्री’वर फिरकून गेले.