तीनही नराधम दोषी!

0

अहमदनगर : कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवरील नृशंस बलात्कार व हत्याकांडप्रकरणी शनिवारी अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना दोषी ठरवले. मागील आठवड्यात अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर शनिवारी न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी या बहुप्रतीक्षित खटल्याचा निकाल दिला. कट रचून मुलीवर अत्याचार करणे, हत्या करणे, बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तीनही आरोपींना दोषी ठरवण्यात आले. 21, 22 नोव्हेंबरला खटल्याची पुढील सुनावणी होणार असून, यावेळी दोषींच्या शिक्षेवर युक्तिवाद केला जाईल. दोषी आरोपींना कोणती शिक्षा होणार याचा निकाल 22 नोव्हेंबरला न्यायालय देणार आहे. यावेळी न्यायालय आरोपींना फाशी किंवा जन्मठेप यापैकी नक्की कोणती शिक्षा सुनावणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.

बलात्कार, हत्या आणि कटाचे आरोप सिद्ध
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे 13 जुलै 2016 रोजी नववीत शिक्षण घेत असलेल्या 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर 15 जुलै 2016 रोजी या गावातील आरोपी जितेंद्र बाबूलाल शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर 16 जुलैरोजी संतोष गोरख भवाळ, नितीन गोपीनाथ भैलुमे या दोघांना अटक झाली होती. जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणी खटला सुरू होता. मागील आठवड्यातच या खटल्याच्या अंतिम युक्तिवादाचे कामकाज पूर्ण झाले. सरकारी पक्षाकडून मृत मुलीची मैत्रिण, आई, बहीण, चुलत आजी, आजोबा, दंतवैद्यकीय डॉक्टर, दोन तपास अधिकारी, पंच अशा एकूण 31 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. तर आरोपी संतोष भवाळच्यावतीने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक बचावाचा साक्षीदार तपासण्यात आला. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तिन्ही आरोपींविरुद्ध 24 वेगवेगळे परिस्थितीजन्य पुरावे सादर केले होते. शनिवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास न्यायालयीन कामकाजाला सुरूवात झाली. त्यानंतर काही वेळातच न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी खटल्याचा निकाल दिला. त्यानुसार तीनही आरोपींना दोषी ठरवण्यात आले. कट रचून मुलीवर अत्याचार करणे, हत्या करणे, बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. येत्या 21 आणि 22 तारखेला या खटल्याची पुढील सुनावणी होईल. दोषींच्या शिक्षेवर युक्तिवाद केला जाणार असून, त्यांना शिक्षा काय होणार याचा निकाल 22 नोव्हेंबरला दिला जाणार आहे.

घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद
कोपर्डी येथील तुकाई लवण वस्ती परिसरात 13 जुलै 2016 रोजी सायंकाळी सात वाजता नववीत शिकाणारी शाळकरी पीडित मुलगी आजोबांच्या घरी मसाला आणण्यासाठी गेली होती. मसाला घेऊन ती पुन्हा घराकडे निघाली असता जितेंद्र शिंदे याने तिला रस्त्यात अडविले. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला व त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. प्रतिकारात पीडितेचे दोन्ही होत मोडलेले होते. पीडितेच्या चुलत्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी घटनेच्या दुसर्‍या दिवशी आरोपी जितेंद्र शिंदे याला श्रीगोंदे येथून ताब्यात घेतले. त्यानंतर चार दिवसांनी संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांना अटक करण्यात आली. या घटनेने राज्यभर संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. राज्यात ठीकठिकाणी मराठा मोर्चे निघाले होते. या मोर्चामध्ये कोपर्डी प्रकरणातील दोषींना फाशी देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवू, असे आश्‍वासन दिले होते.

31 साक्षीदार, 24 परिस्थितीजन्य पुरावे
कोपर्डी खटल्याचा निकाल जलदगतीने लागावा यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सलग तीन दिवस अंतिम युक्तिवाद केला होता. जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी आणि रविवारी सुट्टी असूनही खटल्याचे कामकाज झाले. तीन दिवसीय युक्तिवादात निकम यांनी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमेने कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्या केल्याचा युक्तिवाद केला. “या खटल्यात एकही प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता. परिस्थितीजन्य पुरावे आमच्यासाठी महत्त्वाचे होते. पीडित मुलीचा रक्तगट अ होता. तर जितेंद्र शिंदेचा रक्तगट ओ होता. पीडित मुलीच्या रक्ताचे डाग आरोपीच्या कपड्यांवर होते. रक्ताचे नमुने तपासले असता जितेंद्र शिंदेच्या कपड्यांवर पीडित मुलीच्या रक्ताचे डाग असल्याचे स्पष्ट झाले आणि न्यायालयासमोर हाच पुरावा महत्त्वाचा ठरला’’, असे विशेष सरकारी वकील उज्ज्व निकम यांनी सांगितले. घटनेच्या दोन दिवसांपूर्वी आरोपींनी पीडित मुलीची छेड काढली होती. पीडित मुलीवर बलात्कार करण्याची धमकी त्यांनी दिली होती, या घटनेचे साक्षीदार होते आणि हा पूर्वनियोजित कट असल्याचे आम्ही न्यायालयात सिद्ध केले. तिघांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असे निकम म्हणाले.

त्यांचेही लचके तोडा : पीडितेची आई
सुनावणीनंतर पीडित मुलीच्या आई म्हणाली, उज्ज्वल निकम, मुख्यमंत्री, मराठी समाज यासर्वांची मी आभारी आहे. माझ्या छकुलीला सर्वांनी साथ दिली. आता माझी अपेक्षा आहे की, 22 तारखेला जो न्याय होईल, तो फाशीचाच झाला पाहिजे. माझ्या छकुलीचे जसे लचके तोडले, तसेच त्या नराधमांचेही लचके तोडा. या निकालासाठी आम्ही खूप वाट पाहिली, या नराधमांना जन्मठेप नको तर फाशीच द्या, समजाला दाखवा, त्याशिवाय अशा नराधमांवर जरब बसणार नाही. दुसर्‍या कोणत्याही मुलीवर अशी वेळ येऊ नये, यासाठी त्यांना फाशी देणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.

कोर्टात सिद्ध झालेले गुन्हे
* कलम 302 : खून
* कलम 376 : बलात्कार
* कलम 120 (ब) : गुन्हेगारी कट रचणे
* कलम 109 : गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणे
* कलम 354 : छेडछाड
* पॉस्को कायद्याअंतर्गत कलम 3

न्यायालयाने दोषींना जास्तीत जास्त शिक्षा करावी, जेणेकरून या शिक्षेनंतर कुणीही अशाप्रकारच्या अत्याचाराला धजावणार नाही.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री