तीन तलाक आणि हलालाने संपवले मीना कुमारीचे जीवन

0

नवी दिल्ली : देशात तीन तलाक पद्धतीवर दीर्घ काळ सुरू असलेल्या चर्चेचा फैसला झाला आहे. तीन तलाक घटनाबाह्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. तीन तलाकने अशिक्षित आणि सामाजिकदृष्ट्या मागास महिलांचे जीवन अंधकारमय केले असे नाही बॉलिवूडची एक जबरदस्त नायिका मीना कुमारी तीन तलाकच्या तडाख्यात सापडली होती.

साठच्या दशकात मीनाकुमारी शोकांतिका साम्राज्ञी मानली जात होती. तिला तीन तलाकने चांगलेच जेरीस आणले होते. तलाक नंतर पुन्हा त्याच पतीशी लग्न करण्यासाठी तिला हलाला करावा लागला होता. हलालामध्ये तलाक पिडित महिला दुसऱ्या माणसाशी लग्न करते. त्याने तिला तलाक द्यायचा नंतर इद्दत म्हणजे मासिक पाळी आल्याची खात्री झाल्यानंतर पुन्हा पहिला पती निकाह लावणार. मीना कुमारीचा निकाह निर्माता कमाल अमरोहीसोबत झाला होता. कमालने एकदा रागाच्या भरात तीन वेळा तलाक म्हटले. त्यामुळे वैवाहिक संबंध संपले. नंतर त्याला पश्चाताप झाला. पण उपाय होता. हलालचा हा महाभयंकर उपाय. मीना कुमारीचा निकाह कमालचा दोस्त अमान उल्लासोबत लावण्यात आला. त्याच्या सोबत काही दिवस काढल्यावर मीना कुमारीने पुन्हा कमालसोबत विवाह केला.

ती म्हणाली होती की धर्माच्या नावावर माझं शरीर दुसऱ्या पुरूषाकडे सोपवून पुन्हा पहिल्या नवऱ्याकडे यायचं हे तर वेश्येप्रमाणे झाले. तिला हे सहन झाले नाही. ती दारूच्या आहारी गेली. हे प्रमाण इतके वाढले की ती आजारी पडली. १९७२ मध्ये केवळ ३९ वर्षाची ही उत्तम अभिनेत्री जग सोडून निघून गेली. अमानुष तलाक आणि हलालाने तिचा बळी घेतला.