मुक्ताईनगर । मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमांतर्गंत मुक्ताईनगर, बोदवड आणि भुसावळ तालुक्यांसाठी असलेल्या ओडीए योजनेचे दोन स्वतंत्र भागात विभाजन आणि नूतनीकरणासाठी 80 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. यामुळे तिन्ही तालुक्यातील 82 गावांमधील पाणीपुरवठ्याची समस्या दीर्घकाळासाठी निकाली निघाली आहे.
51 गावांसाठी स्वतंत्र योजना
ओडीए प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला 25 वर्षे झाल्याने ती कालबाह्य ठरली होती. यामुळे जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागून पाणीपुरवठा खंडीत होणे नित्याचे झाले होते. तसेच वारंवार दुरुस्तीसाठी पैसा उपलब्ध होत नसल्याने योजनेचे नूतनीकरण गरजेचे होते. यासाठी सुमारे चार वर्षांपासून जुन्या ओडीए योजनेचे मुक्ताईनगर-बोदवड आणि भुसावळ तालुका असे दोन भागात विभाजन आणि नूतनीकरणाचे प्रयत्न सुरु होते. यासाठी माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार संजय सावकारे, खासदार रक्षा खडसे यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गंत ओडीएसाठी 80 कोटी रुपये निधी मंजूर झाला. त्यातून मुक्ताईनगर बोदवड तालुक्यातील 51 गावांसाठी स्वतंत्र योजना असेल. त्यावर 45 कोटी 53 लाख, तर भुसावळ तालुक्यातील 31 गावांसाठी 33 कोटी 75 लाख रुपये खर्च होतील. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत ही कामे होणार आहेत.
बोदवड तालुक्याला होणार फायदा
मुक्ताईनगर, बोदवड आणि भुसावळ हे तिन्ही तालुके अवर्षण प्रवण भागातील आहेत. यामुळे येथे दरवर्षी पाणीटंचाई डोके वर काढते. बोदवडसारख्या तालुक्यात कुठेही मोठे धरण अथवा नदी नसल्याने पाणीपुरवठ्यासाठी केवळ ओडीएचा आधार आहे. त्यामुळे योजनेचे नूतनीकरण गरजेचे होते. यामुळे बोदवड तालुक्यात उन्हाळ्यात जाणवणारी पाणी टंचाई कमी होऊन येथील नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.