तीन ते आठ वर्षे वयोगटातील चिमुकल्यांसाठी सानियाची अकादमी

0

हैदराबाद : भारताची आघाडीची टेनिस तारका सानिया मिर्झाने तीन ते आठ वर्षे वयोगटातील चिमुकल्यांसाठी टेनिस अकादमी सुरु केली आहे. मंगळवारी हैदराबाद येथे सानिया मिर्झा टेनिस अकादमी नावाने ग्रासरुट लेव्हलवर प्रशिक्षण सुरु झाले. लहानग्या चिमुकल्यांना सानिया टेनिसचे धडे देताना दिसणार आहे. ‘सानिया मिर्झा टेनिस अकादमी’ नावाने सोमवारपासून ग्रासरूट लेव्हलवर प्रशिक्षण सुरू झाले. येत्या पाच वर्षांत माझ्या अकादमीतील प्रशिक्षित खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकतील, असा आत्मविश्वास सानियाने व्यक्त केला.

आई अकादमीची प्रमुख
सानियाने २०१३मध्ये पहिली अकादमी लाँच केली. त्यानंतर हा दुसरा प्रयत्न आहे. तिची आई या अकादमीची प्रमुख असेल. टेनिसपटू म्हणून काय करावे, कुठे जावे, हे जाणून घेण्यासाठी मला लहानपणी फारच त्रास झाला. किती आणि कसा सराव करावा, हे सांगण्यासाठी कुणी नव्हते. यावर मात करण्यासाठी मी स्वत: लहान वयातील टेनिसपटूंना योग्य मार्गदर्शन करणार आहे, असे सानियाने पत्रकारांशी बोलताना सांगितले. तिने स्पष्ट केले की, माझ्या अनुभवाचा इतरांना फायदा व्हावा आणि खेळाडूंना सर्वोच्च पातळीवर खेळण्याची सर्वोत्तम संधी मिळावी, अशी माझी मनोकामना आहे.

योग्य प्रशिक्षणाची गरज
सानिया म्हणाली, ‘ग्रासरुट लेव्हल अकादमी सुरु करण्याचे श्रेय माझी आई व मित्रांना जाते. टेनिसमध्ये लहान वयात मोठी स्पर्धा आहे. यावर मात करण्यासाठी योग्य प्रशिक्षणाची गरज असते. यशस्वी खेळाडू बनण्यासाठी तर तीन-चार वर्षापासून टेनिस शिकणे गरजेचे आहे. ही अकादमी अडीच वर्षापासून ते आठ वर्षापासूनच्या टेनिसपटूंना घडवणार आहे’, असेही तिने यावेळी सांगितले. या अकादमीमध्ये लहानग्या मुलांसाठी प्रारंभापासून योग्य प्रशिक्षणासोबत, योग्य आहार व तंदुरुस्ती राखण्यासाठी मार्गदर्शन तसेच कठोर मेहनतीसाठी अद्यावत जिम असणार असल्याची माहिती तिने यावेळी दिली.

महत्त्वाकांक्षी योजना
या अकादमीद्वारे वाजवी दरात तरुण खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण देण्याची महत्त्वाकांक्षी योजना तिने आखली आहे. नियोजित अकादमी चार एकर जागेत बांधण्यात येत आहे. सुरुवातीला नऊ हार्ड कोर्ट तयार करण्यात येणार आहेत. त्यानंतर आणखी नऊ हार्ड कोर्ट आणि तीन क्ले कोर्ट तयार केले जातील. सानियाचे वडिल इम्रान हे सध्या अकादमीसाठी प्रायोजक मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सानियाने सांगितले की, ज्या खेळाने पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिली त्यासाठी काहीतरी योगदान करण्याचा माझा उद्देश आहे. गेल्या काही वर्षांपासून मी अकादमी काढण्याचा विचार करीत होते. खेळासाठी आणि देशासाठी मला योगदान द्यायचे आहे.