श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील बामनू येथे सोमवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत भारतीय जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. शोधमोहीम सुरू असताना आणखी दोन दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले.
दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरु केली. त्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर संध्याकाळी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. सैन्याच्या कारवाईत मृत्यू झालेल्या एका दहशतवाद्याचे नाव किफायत आहे. या चकमकीदरम्यान स्थानिकांनी दगडफेक केल्याने दोन ते तीन दहशतवाद्यांना पळ काढण्यात यश आल्याचे वृत्त आहे. मात्र अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळू शकलेला नाही. हे सर्व दहशतवादी हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे समजते. सुरक्षा दलाची शोधमोहीम उशीरापर्यंत सुरू होती.