तीन दिवसांपासून 36,166 घरे अंधारात

0

पुणे । पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह ग्रामीण भागात वीजबिलांचे थकबाकीदारांविरोधात महावितरणने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यासाठी ’शून्य थकबाकी’ मोहिम आखण्यात आली आहे. थकबाकीची रक्कम न पाहताच कारवाई करण्यात असल्याने फक्त एक महिन्याच्या बिलाचा भरणा न केलेले, फक्त हजार रुपायंची थकबाकी असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. सुमारे 36 हजार 166 घरे गेल्या तीन दिवसांपासून अंधारात गेली आहेत. ही विशेष ’शून्य थकबाकी’ मोहिमेत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ही मोहीम सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहे.

17 हजार जणांची कायमस्वरुपी वीज बंद
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा 33 हजार 989 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 18 कोटींच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. यात तब्बल 17 हजार 489 थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. तसेच मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील 2,177 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 3 कोटी 46 लाखांच्या थकीत वीजबिलांमुळे खंडित करण्यात आला आहे.

21 कोटींची थकबाकी
वीजबिलांची थकबाकी वसूल करण्यासाठी पुणे परिमंडलात ’शून्य थकबाकी’ची विशेष मोहिम सुरू झाली आहे. गेल्या तीन दिवसांत पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील 21 कोटी 45 लाख रुपयांची थकबाकी असलेले 36 हजार 166 वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यात 17 हजार 983 वीजग्राहकांचा 10 कोटी 33 लाखांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे.

सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरू
थकबाकी व चालू बिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा, म्हणून पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र 11 व 12 तसेच 14 नोव्हेंबरला सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. थकीत वीजबिल भरण्यासाठी स्थानिक वीजबील भरणा केद्रांसह व घरबसल्या ’ऑनलाईन’ पेमेंटसाठी महावितरणची ुुु.ारहरवळीलेा.ळप ही वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.