16 आरसीसी इमारती, 53 पत्राशेड
भोसरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनधिकृत बांधकाम विरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील वडमुखवाडी, चोविसावाडी, चिखली, तळवडे परिसरातील 69 बांधकामांवर गेल्या तीन दिवसात हातोडा चालविला आहे. पोलिस बंदोबस्तात बांधकामे पाडण्यात आली आहेत. आठ क्षेत्रीय कार्यालयानुसार अनधिकृत बांधकाम विभागाने कारवाईचे नियोजन केले होते. सुरुवातीला चिंचवड विधानसभा मतदारसंघातील बांधकामांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर मागील आठवड्यापासून भोसरी विधानसभा मतदारसंघातील बांधकामांवर कारवाई सुरू केली.
16 पत्राशेडवर कारवाई
वडमुखवाडी, चोविसावाडी, तळवडे, जाधववाडी व चिखली परिसरात केलेल्या कारवाईत एकूण अनधिकृत 16 आरसीसी चालू बांधकामे व 53 पत्राशेड जमीनदोस्त केल्या. या कारवाईत एकूण 43 हजार चौरस फूट आकाराचे बांधकाम पाडण्यात आले. ही कारवाई तीन दिवस करण्यात आली. पोलिस बंदोबस्तात झालेल्या कारवाईत जेसीबी, डंपर, मजूर आदींचे सहाय्य घेण्यात आले. शहरात नियोजनानुसार कारवाई सुरू आहे. त्यामुळे शहरातील सर्वच भागांमध्ये टप्प्याटप्प्याने अनधिकृत बांधकाम व पत्राशेडवर कारवाई केली जात आहे.