तीन दिवस बँका बंद

0

मुंबई : नोटबंदी, एटीएम वापराचे कठोर नियम, दोन हजाराच्या नोटेमुळे सामान्यांची होणारी अडचण या समस्यांतून मार्ग निघण्याआधीच बँकाची सलग तीन दिवसांची सुटी आली आहे. या सुटीमुळे मुंबईसह महाराष्ट्रात बँका शनिवार 11 मार्चपासून (महिन्यातील दुसरा शनिवार) सोमवार 13 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. बँकांचा कारभार मंगळवारी 14 मार्चपासून पुन्हा सुरू होणार आहे. सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्यामुळे नागरिकांची मोठी अडचण होणार आहे.

एटीएममध्ये पुरेशी रक्कम असेल का?
येत्या रविवारी 12 मार्चला होळी आणि सोमवारी 13 मार्चला धुलिवंदन आहे. सणासुदीचे दिवस असल्यामुळे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. अशा वेळी रोख रक्कम हवी असल्यास नागरिकांना एटीएमचा आधार असेल. त्यामुळे सलग तीन दिवस एटीएममध्ये पुरेशी रक्कम राखण्याकरिता नियोजन करत असल्याचा दावा बँका करत आहेत. दरम्यान, स्टेट बँक, आयसीआयसीआय, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस या बड्या बँकांनी एटीएमच्या वापरासंदर्भात तसेच खात्यात किमान रक्कम राखण्यासाठी (मिनिमम बॅलन्स) कठोर नियम केले आहेत. या नियमांविषयी सर्वत्र नाराजी व्यक्त होत असली तरी अद्याप बँकांनी हा निर्णय बदललेला नाही.

लवकरच येणार दहा रुपयांची नवी नोट
दरम्यान, सुरक्षेच्या नव्या वैशिष्ट्यांसह दहा रुपयांची नवी नोट लवकरच बाजारात दाखल होणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँक ऑफ (आरबीआय) इंडियाने केली आहे. ही नोट 2005 च्या महात्मा गांधी मालिकेतील असेल. त्यावर आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल. नोटेच्या एका बाजूला ‘द इअर ऑफ प्रिंटिंग, 2017’ असा इंग्रजी अक्षरातील मजकूर असेल. सध्या चलनात असलेल्या पाचशे रुपयांच्या नोटेप्रमाणे दहा रुपयांच्या नव्या नोटेवरील क्रमांकातील प्रत्येक आकड्याचा आकार वेगवेगळा (डावीकडून उजवीकडे वाढत जाणारा) असेल. मात्र, त्यातील पहिल्या तीन अक्षरांचा आकार सारखाच असेल. या नव्या नोटांसह सध्या चलनात असलेल्या जुन्या नोटाही चलनात कायम असतील, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.