पुणे : 31 डिसेंबरची रात्र आणि पुढील फेस्टिव्ह सिझन लक्षात घेता, मद्यविक्रीतून जास्तीत जास्त कर वसूल करण्यासाठी राज्य सरकारने दारु दुकाने, बार, हॉटेल्स यांना तीन दिवस रात्री उशिरापर्यंत मद्यविक्रीस व दुकाने, बार, हॉटेल्स सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. 24, 25 व 31 डिसेंबरला सकाळी 5 वाजेपर्यंत तर रात्री एक वाजेपर्यंत मद्यविक्री दुकाने चालू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी दिली आहे. नवीन वर्ष सुरू होण्यासाठी जेमतेम आठवडाच उरला आहे. यंदाची थर्टीफर्स्ट झोकात आणि जोशात साजरी करण्यासाठी तळीरामांनी आतापासूनच तयारी केली आहे. पुणे, मुंबईत आणि मुंबईबाहेर यंदाचा थर्टीफर्स्ट साजरा करण्याचे बेत आखले आहेत. त्यासाठी हॉटेल आणि पबही बुक केले जात आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे तळिरामांना लॉटरीच लागली असून, त्यांना या तीन दिवसात नाच-गाण्यांचा आनंद घेताघेता भरपूर दारू ढोसत मटन-मच्छिवर ताव मारता येणार आहे.
गृहखात्याशी सल्लामसलतीनंतर निर्णय!
राज्याच्या गृहखात्याने उत्पादन शुल्क विभागाशी चर्चा करून नाताळ आणि नववर्षानिमित्त तीन दिवस पुणे, पिंपरी-चिंचवड व मुंबईतील हॉटेल, बार आणि पब्स उशिरापर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देणारे परिपत्रक जारी केले असल्याची माहिती देण्यात आली आहे. इतर वेळी रात्री दीड वाजेपर्यंत सुरू राहणारी हॉटेल्स, बार आणि पब्स 24, 25 आणि 31 डिसेंबरला पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. तर एरव्ही रात्री साडेदहा वाजेपर्यंत सुरू राहणारे वाईन शॉप्सही हे तीन दिवस एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे तळीरामांना या तीन दिवसात फुल्लटू होईपर्यंत मद्यपानाचा आनंद लुटता येणार आहे.
जीएसटीमुळे करमणूक कर आकारणीबाबत संभ्रम
नाताळ व लागोपाठ येणार्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहर, जिल्ह्यातील हॉटेल्स, लॉन्स, रेस्टॉरंट चालकांकडून दरवर्षी आयोजित करण्यात येणार्या करमणुकीच्या कार्यक्रमासाठी यंदा वस्तू व सेवाकर (जीएसटी)मुळे करमणूक कर आकारणी होणार की नाही, याबाबत शासकीय पातळीवरील संभ्रम दूर करण्यास कोणीही पुढे न आल्यामुळे हॉटेल्स चालकांची चंगळ झाली असून, मनोरंजनाच्या कार्यक्रमाबरोबरच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खर्चिक योजना जाहीर करून ग्राहकांना लुटण्याची चढाओढ लागल्याचे वृत्त आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये दरवर्षी जुन्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या धुमधडाक्यात करण्याची प्रथा सुरू झाली आहे, साधारणत: मोठे हॉटेल्स, लॉन्स, रेस्टारंट व परमीट रूम यांच्याबरोबरच खासगी व्यक्तींकडून निसर्गरम्य ठिकाणी 31 डिसेंंबरला पहाटेपर्यंत खाण्या-पिण्याची सोय करण्याबरोबरच ग्राहकांना रिझविण्यासाठी मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशा कार्यक्रमातून शासनाला दरवर्षी एकट्या 31 डिसेंंबर रोजी लाखो रूपयांचा महसूल मिळत होता. परंतु, आता शासनाने सर्व प्रकारचे कर दूर सारून जीएसटी ही एकमेव करप्रणाली लागू केल्याने त्याचा पुरेपूर फायदा यंदा 31 डिसेंबरचे आयोजन करणार्यांनी उचलण्यास सुरूवात केली आहे. काही हॉटेल्स, रेस्टॉरंट चालकांनी करमणूक कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी अनुमती घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता, शासनाने करमणूक कर रद्दच केल्यामुळे कशाच्या आधारे कार्यक्रमांना अनुमती द्यावी व नाकारावी असा प्रश्न अधिकार्यांना पडला आहे.