तीन ‘नाइट शेल्टर’ बंद

0

स्वयंसेवी संस्थांबरोबर करार करण्यास मान्यता द्या : स्थायी समितीसमोर ठेवणार प्रस्ताव

पुणे : रस्त्यावर गुजराण करणार्‍यांच्या सोयीसाठी पालिकेने चार संस्थांच्या मदतीने शहरात उभारलेल्या चार रात्रनिवारा प्रकल्पांपैकी (नाइट शेल्टर) तीन प्रकल्प बंद पडले आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून शहराच्या अन्य भागात हे प्रकल्प सुरू करण्याचे स्वप्न प्रशासन पाहत आहे. नाइट शेल्टर सुरू करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांबरोबर करार करण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. येत्या मंगळवारी (4 सप्टेंबर) आयोजित समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

शासनाच्या आदेशानुसार उभारणी

पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांमध्ये एक लाख लोकसंख्येमागे एक याप्रमाणे पालिकेने ’नाइट शेल्टर’ उभारावेत, असे आदेश राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने दिले आहेत. त्यानुसार ’नाइट शेल्टर’ उभारणीचे काम सुरू आहे. शहराची लोकसंख्या 38 लाख असल्याचे गृहीत धरून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शहरातील बेघर आणि निराधार लोकांसाठी निवार्‍याची सोय व्हावी, यासाठी पालिकेने यापूर्वी चार ठिकाणी हा प्रकल्प सुरू केला होता. पुणे महानगरपालिका, समाज विकास विभागामार्फत स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने शहरात रात्रनिवारा प्रकल्प राबविण्यात येत आहेत.

1 कोटीची तरतूद

नवी पेठेतील सेनादत्त पोलिस स्टेशनजवळ, पुणे स्टेशन, बोपोडी आणि येरवड्यात प्रकल्प सुरू केले आहेत. मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पांची अवस्था दयनीय आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून अन्य भागात प्रकल्प सुरू करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. पालिकेच्या अंदाजपत्रकात या उपक्रमासाठी एक कोटी रुपयांची तरतूद असल्याने निधी खर्च पडावा, यासाठी हे उद्योग सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

प्रकल्पांची दयनीय अवस्था

शहरातील रस्ते, बस आणि रेल्वे स्थानकांवर आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेक नागरिक झोपतात. त्यामुळे अनेकदा अपघात झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने बेघर असलेल्यांसाठी पालिकांना नाइट शेल्टर उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर न्यायालयानेही पालिकेचे कान टोचल्याने प्रशासनाने चार भागांत प्रकल्प सुरू केले. मात्र, या प्रकल्पांची सद्यस्थिती अतिशय दयनीय असून, नवी पेठ आणि पुणे स्टेशन परिसरातील प्रकल्प बंद पडले आहेत. तर, बोपोडी येथील प्रकल्पात अवघे दोन ते तीन नागरिक फायदा घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी सुरू करण्यात आलेले प्रकल्प बंद पडले असताना पुढील तीन वर्षांसाठी नाइट शेल्टर उभारण्यासाठी स्वयंसेवी संस्थांबरोबर करार करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला आहे. 2018-19 ते 2020-21 या तीन वर्षांच्या कालावधीत विविध भागात हे प्रकल्प राबविणार आहे. यासाठी येरवडा येथील जॉन पॉल स्लम डेव्ह, पुणे युथ फाउंडेशन, जान्हवी फाउंडेशन, ओबीसी सेवा संघ या स्वयंसेवी संस्थांबरोबर करार करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे.