अन्न औषधी विभागाची जोशीपेठेत कारवाई
जळगाव: शहरातील जोशीपेठेतील जुना नशिराबाद रस्त्यालगतच्या घराच्या तळघरातून औषध प्रशासनाच्या पथकाने विनापरवानगी असलेला गर्भपाताच्या किटसह ‘ट्रॅमडॉल’ या औषधींचा 22 लाख 56 हजार रुपयांचा औषधसाठा जप्त केला होता. सहा दिवसानंतर या प्रकरणी स्टे वेल हेल्थकेअर’ चे मालक नरेंद्र परमानंद प्यारपानी वय 40 याच्याविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जोशीपेठेतील तळघरामध्ये विनापरवाना औषधसाठा ठेवण्यात आल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार एफडीएचे औषध निरीक्षक मनोज अय्या, महेश कवटीकवार, जोसेफ चिरामेल यांच्या पथकाने जोशीपेठेतील नरेंद्र परमानंद प्यारपानी यांच्या घरी तपासणी केली. त्यात प्यारपानी यांच्या तळघरात औषधसाठा आढळला. पथकाने तो तपासला असताना त्यात गर्भपाताच्या किट्स व ट्रॅमडॉल औषधींचे 12 खोके आढळले. हा औषधसाठा जप्त करण्यात आला. प्यारपानी यांचे ‘स्टे वेल हेल्थकेअर’ हे औषधींचे दुकान आहे. मात्र, त्यांनी घराच्या तळघरात हा विनापरवानगी औषधसाठा ठेवलेला होता. जप्त औषधसाठा सील करून एफडीएच्या गोदामात ठेवण्यात आलेला आहे.
सहा दिवसानंतर अखेर गुन्हा दाखल
परवानगी नसलेल्या गर्भपाताच्या किट्सचा विनापरवानगी साठा जप्त करून सहा दिवस लोटले आहेत. शुक्रवारी याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अन्न व औषधी प्रशासन विभागाचे निरिक्षक मनोज नंदकुमार अय्यर याच्या फिर्यादीवरुन नरेंद्र प्यारप्यानी विरोधात औषधे व सौदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत कलम 18 ए, 18 (सी) व 22 (1) (सीसीए) शिक्षा कलम व भारती दंड विधान संहितेच्या कलम 276, 34 चे उल्लंघन याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. प्यारपानी यांच्याकडे हा औषधसाठा कोठून आला? अवैध गर्भपात करण्यासाठी याचा वापर केला जात होता काय? तळघरातून कोणत्या डॉक्टरांना या गर्भपाताच्या किट्सचा पुरवठा करण्यात येत होता? असे अनेक प्रश्न हा साठा जप्त झाल्यानंतर निर्माण झाले आहेत. या प्रकरणात रॅकेट सक्रिय असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.