तीन महिन्यांत भूसंपादनाची प्रक्रिया

0

महामेट्रो’तर्फे बाधित कुटुंबांचे सर्वेक्षण; भुयारी स्टेशनमुळे बाधित होणार्‍यांसाठी पुनर्वसनाचे तीन पर्याय

पुणे : पुणे मेट्रोच्या भुयारी मार्गावरील बुधवार पेठ (फडके हौद) स्टेशनकरिता लागणार्‍या जागेमुळे अडीचशे कुटुंबे बाधित होणार असून, या सर्व कुटुंबांचे पुनर्वसन स्टेशनपासून जवळच करण्याचे नियोजन महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) केले आहे. येत्या आठवड्यापासून सर्व संबंधितांशी चर्चा करण्यात येणार असून, आगामी दोन ते तीन महिन्यांत भूसंपादनाची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे महामेट्रोचे उद्दिष्ट आहे.भुयारी स्टेशनमुळे बाधित होणार्‍या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी तीन पर्याय निश्‍चित केल्याची माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक प्रमोद आहुजा यांनी मंगळवारी दिली. ‘महामेट्रो’तर्फे बाधित कुटुंबांचे सर्वेक्षण केले जात होते. ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसली, तरी त्यांच्या पुनर्वसनासाठीचे धोरण निश्‍चित झाले आहे.

पालिका शाळेच्या जागेवर पुनर्वसन

सर्व नागरिकांनी रोख मोबदला किंवा दूर जाण्यास नकार देत, आहे त्याच परिसरात घराची मागणी केल्यास सर्व अडीचशे कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी पुरेशा जागेचे नियोजन महामेट्रोने केले आहे. महापालिकेकडून उपलब्ध होणार्‍या शाळेच्या जागेवर नवीन इमारत बांधून सर्वांचे पुनर्वसन तेथे केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. महापालिकेने ही जागा देण्यास तत्त्वत: संमती दिली असून, भूसंपादनाची सर्व प्रक्रिया येत्या दोन-तीन महिन्यांत पूर्ण केली जाईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

शिवाजीनगरसाठी दोन पर्याय

पिंपरी ते स्वारगेट मार्गावरील पहिले भुयारी स्टेशन शिवाजीनगर येथे आहे. शिवाजीनगर येथील राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) स्थानक तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करावे लागणार आहे. त्यासाठी, एसटी प्रशासनासोबत मुंबई येथेही नुकतीच बैठक झाली असून, मुळा रोड आणि संगमवाडी अशा दोन जागांचे पर्याय त्यांना सुचविण्यात आले आहेत. एसटी प्रशासनाने त्यापैकी एका जागेला मान्यता दिल्यानंतर तेथे मेट्रोचे काम सुरू केले जाणार आहे. शिवाजीनगर स्थानकाचा पुनर्विकास ‘सार्वजनिक-खासगी भागीदारी’ तत्त्वावर केला जाणार असून, मेट्रोच्या भुयारी स्टेशनशी ‘कनेक्टिव्हीटी’चे काम महामेट्रोतर्फे केले जाणार आहे.

वैयक्तिक संवाद साधून अंतिम निर्णय

बाधित कुटुंबांना रोख मोबदला, सध्याच्या जागेपासून जवळच्या परिसरात सध्याच्या जागेएवढे घर किंवा लांब जाण्याची तयारी असल्यास आत्तापेक्षा अधिक जागा, असे पर्याय देण्यात येणार आहेत. सर्व नागरिकांशी वैयक्तिक संवाद साधून त्यांच्या सूचना विचारात घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, असे आहुजा यांनी स्पष्ट केले.

भुयारी मार्गाचे काम दोन टप्प्यांत

महामेट्रोच्या पाच किमीच्या भुयारी मार्गाचे काम दोन टप्प्यांत केले जाणार आहे. ऑक्टोबरअखेरपर्यंत हे काम करण्यासाठी पात्र कंत्राटदाराची निवडप्रक्रिया पूर्ण केली जाणार असून, त्यानंतर डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असेल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. भुयारी मार्गाचे काम सुरू झाल्यावर पुढील तीन वर्षांत संपूर्ण काम पूर्ण करून मेट्रो कार्यान्वित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.