तीन महिन्यांपासून मानधन नाही

0

बोदवड। ता लुक्यातील बाल प्रकल्प विकास अंतर्गत 94 नियमित अंगणवाडी, 7 मिनी अंगणवाड्या आहेत. बोदवड तालुक्यात एकूण 94 अंगणवाडीसेविका व 94 मदतनिस आणि सात मिनी अंगणवाडी अशा एकूण 195 अंगणवाडी कर्मचारी. डिसेंबर पासून अंगणवाडी सेविकांचे मानधन दिले गेले नसल्याने अंगणवाडीसेविका व मदतनिसावर उपासमारीची वेळ आली आहे. किरकोळ मानधनावर ह्या अंगणवाडी सेविका काम करत असून ते देखील त्यांना वेळेवर मिळत नसल्याने त्यांची परिस्थिती हालाखीची बनली आहे. तसेच या अंगणवाडी सेविकांना विविध बैठका, प्रशिक्षणासाठी तालुका तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. कोणतेही खर्च यांना देण्यात येत नसल्याने त्यांची परिस्थिती बिकट बनली आहे. अंगणवाडी चालवितांना लागणारे इतर खर्च ही त्यांना मिळत नसल्याचे अंगणवाडी सेविकांचे म्हणने आहे.
स्मार्ट अंगणवाडी कशा बनणार
महिला बालकल्याण विभागातर्फे चालविणल्या जाणार्‍या अंगणवाडी मार्फत कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच महिलांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मोठ मोठ्या शाळा, इंग्रजी माध्यमांच्या के.जी. उपलब्ध असतांनाही अंगणवाडी कायम आहे. राज्यातील अंगणवाडी स्मार्ट अंगणवाडी बनविण्याची घोषणा शासनातर्फे महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. मात्र अंगणवाडीत काम करणार्‍या अंगणवाडी सेविका, मदतनिसांना मानधन दिले जात नसल्याने ते किती दिवस मोफत काम करुन शकतील? अंगणवाड्यांना सुविधा पुरविले जात नसतांना अंगणवाड्या कसे काय स्मार्ट होतील हा प्रश्‍न आहे.
मानधन कधीच वेळेवर नाही
अंगणवाडी कर्मचार्यांचे मानधन कधीही वेळेवर मिळत नाही. अंगणवाडी कर्मचार्यांची बिले ट्रेझरीत कधीही वेळेवर पास होत नाही. काहीना काही त्रुटी काढून वेळ मारुन नेली जाते. आयुक्त कार्यालयाकडून पीएफएमएस सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे मानधन मिळणार असे सहा महिन्यांपुर्वीच प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी दमयंती इंगळे यांनी सांगितले होते. 25 ते 30 हजार पगार घेणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांचे चे पगार वेळेवर होतात परंतु ज्या अंगणवाडी महिला कर्मचारी शासनाला दरमहा जन्मापासून ते मृत्युपर्यंतची, प्रसुतीपासून ते गर्भवस्थेपर्यंतची माहिती घरपोच देतात.
आंदोलने देखील केली
जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविकांना डिसेंबर 2016 पासूनचे थकीत मानधन अदा करण्यात यावे, लाईन लिस्टिंगच्या कामाची प्रकल्प कार्यालयांकडून होणारी सक्ती थांबवावी, एप्रिल ते ऑगस्ट 2015 या कालावधीतील मानधनवाढीची थकबाकी देण्यात यावी, मानधन वाढ करण्यात यावी, प्रलंबीत सेवा समाप्ती लाभाचे प्रस्ताव सादर करण्यात यावे तसेच अंगणवाडी केंद्राच्या कामासाठी लागणारे रजिस्टर, स्टेशनरी आदी साहित्य पुरविण्यात याव्या अशा विविध मागण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी आंदोलन मोर्चे देखील केले आहे. महिला दिनानिमित्त देखील आंदोलने केली होती.