चाळीसगाव : तालुक्यात बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून तीन महिन्यात बिबट्याने तब्बल चार जणांचे बळी घेतल्याने वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. तालुक्यातील वरखेडे गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या दरेगाव रस्त्यालगत शेतात कपाशी वेचणार्या दीपाली नारायण जगताप (वय 25, वरखेडे, ता.चाळीसगाव) या विवाहितेचा बिबट्याच्या हल्ल्यात बुधवारी दुपारी बळी गेला.
तीन महिन्यात गेले चार बळी
बिबट्याने आतापर्यंत तीन महिन्यात चार जणांचे बळी घेतले आहेत तर काही जणांना जखमी केले आहेत. ऑगस्ट महिन्यात काठेवाडी समाजाचा बालक राहुल चव्हाण (12) तर सप्टेंबर महिन्यात उंबरखेडे येथील अलका गणेश अहिरे तर तीन दिवसांपूर्वीच नांदगाव तालुक्यातील बेहळगाव येथील बाळू सोनवणे (12) या बालकाचा बिबट्याने बळी घेतला होता. ही घटना ताजी असतानाच वरखेडे येथील दीपाली जगताप (25) या विवाहितेचा बळी गेला.