तीन मोटारसायकलची चोरी; पोलिसांना आव्हान

0

नंदुरबार । शहरातील वाघोदा रस्त्यावर असलेल्या शिवनंदन कॉलनीत चोरांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री सुमारे सव्वा लाखाच्या तीन मोटार सायकल चोरून पोलिसांना आव्हान दिले आहे. उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. शहरात मोटार सायकल चोरणारी टोळी पुन्हा सक्रीय झाली असून एक दिवसाआड होणार्‍या मोटार सायकल चोरीमूळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. पहिल्या गुन्हाचा तपास लागत नाही तोच पुन्हा वारंवार मोटारसायकली चोरी होत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शहरातील वाघोदा रस्त्यावर असलेल्या शिवनंदन कॉलनीतील एकाच रात्री तीन मोटार सायकल चोरांनी लंपास केल्या आहेत. त्यात विमलसिंग पाडवी यांच्या मालकीची प्लसर 50 हजार किमतीची, हेमंत पाठक यांच्या मालकीची होंडा शाईन 40 हजार रुपये किंमतीची, अभिमन्यू वळवी यांच्या मालकीची विना नंबरची 40 हजार रुपये किंमतीची मोटार सायकल अशा प्रकारे तीन मोटार सायकल चोरांनी चोरून नेल्या आहेत. त्यांची किंमत 1 लाख 30 हजार रुपये इतकी आहे. याबाबत विमलसिंग विक्रमसिंग पाडवी यांनी उपनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.