तीन राज्याचा अनोखा संबंध जोडणारा विवाह सोहळा

0

शहादा : बालपणापासूनच आजोळी मामांकडे राहणार्‍या जव्हेरी कुटूंबातील कन्येचा विवाह रविवारी, 19 रोजी शहाद्यात होत आहे. मामांच्या घरीच कन्यादानाचे सौभाग्य लाभलेल्या चि.सौ.कां.भावना उर्फ देवयानी हिचा जन्म राजस्थानचा तर बालपणासह शिक्षण महाराष्ट्रातील असून विवाहानंतर ती तेलंगणा राज्यात स्थायिक होणार असल्याचा हा जीवनप्रवास अनोख्या स्वरुपाचा असल्याने तीन राज्यांना एका सुत्रात जोडणारा विवाह सोहळा संस्मरणीय ठरणारा आहे.

मूळचे कोपर्ली, ता.नंदुरबार येथील व व्यवसायानिमित्त शहाद्यात स्थायिक झालेले पूनमचंद भगवान जव्हेरी यांचे मध्यमवर्गीय कुटूंब. पारंपरिक हॉटेल व्यवसायासोबत शेती हा व्यवसाय असलेल्या जव्हेरी कुटूंबातील चौघा भावांची बहिण ललिता हिचा सुमारे 35 वर्षापूर्वी बाँरा (राजस्थान) येथील ओमप्रकाश गणपतलाल जव्हेरी यांच्याशी विवाह झाला. ओमप्रकाश जव्हेरी यांचा किराणा व्यवसाय असल्याने परिस्थिती जेमतेमच. म्हणूनच शहाद्यातील जव्हेरी कुटूंबातील राजस्थानात दिलेल्या कन्येच्या पोटी जन्मास आलेल्या कु.भावनाला बालपणीच तिचे मामा स्व.राजेंद्र व कुटूंबियांनी महाराट्रात आजोळी आणले. तिच्या शिक्षणासह विवाहाची जबाबदारीही आपणच घेणार असे आजोबांसहीत मामांनी बहिण व मेहूण्यास सांगितले. त्यानुसार भावना हिचे शिक्षण पूर्ण केले. बी.ए. व डी.एड.ची पदवी घेतल्यानंतर तिचा विवाह करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार तेलंगणा राज्यातील शाम मदनलाल जव्हेरी यांचे इंजिनिअर असलेले सुपूत्र चि.संतोष यांच्याशी गत फेब्रुवारी महिन्यात वाड:निश्‍चय पार पडला.

बहिण व मेहूण्यांची सर्वसामान्य परिस्थिती जाणून व स्वत:ही अशा परिस्थितीचा अनुभव घेतला असल्याने तिघा मामांनी तिचा विवाह थाटात करण्याचे ठरविले. विवाहाचा सर्व खर्च मामा संतोष जव्हेरी, दिनेश जव्हेरी व दीपक जव्हेरी हे करीत आहे. भावनाचा जीवन प्रवास तीन राज्यांना जोडणारा ठरणार आहे. थोरले मामा स्व.राजेंद्र यांनी व्यक्त केलेली इच्छा या विवाह सोहळ्यानिमित्त पूर्ण होणार आहे.