फैजपूर:- देशातील तीन राज्यात झालेल्या बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी 10 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून प्रांत कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. शहरातील सर्व जाती-धर्मातील नागरीकांचा या मोर्चात सहभाग होता तर पाच वर्षीय बालिकेच्या हस्ते मागण्यांबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
दोषी आरोपींना फाशीची मागणी
जम्मू काश्मिरातील कठुआमध्ये आठ वर्षीय बालिकेवर नराधमांनी अत्याचार करून तिचा खून केल्याची संतापजनक घटना घडली त्यानंतर सुरत येथे 10 वर्षीय बालिकेवर अमानवीय पद्धतीने अत्याचार करून हत्या करण्यात आली तसेच उन्नाव येथे तर आमदारासारख्या व्यक्तीने अत्याचार करीत पीडितेच्या वडिलांची हत्या करण्याची हिंमत केलेली दुर्दैवी बाब आहे. अत्याचारांच्या घटनेमुळे माणुसकीला काळीमा फासला गेला असून देशात निर्माण झालेल्या घटनांचा निषेध करणे हे जागरूक मनुष्याचे लक्षण आहे. कठूवा (जम्मू काश्मीर), उन्नाव (उत्तरप्रदेश) व सुरत (गुजरात) येथील अल्पवयीन चिमुरडींवर झालेल्या अत्याचाराच्या घटना निषेधार्थ व संतापजनक असून यातील दोषींना फाशी देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. आपापसातील माणुसकीचे नाते घट्ट व्हावे व सदर प्रकारचा संविधानिक पद्धतीने निषेध करता यावा याकरीता सोमवारी फैजपूर शहरातील सर्व जाती-धर्माच्या नागरीकांनी निषेध मोर्चा काढला. नायब तहसीलदार पी.सी.धनगर यांना निवेदन देण्यात आले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त राखण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष शेख कलीम मणियार, नगरसेवक शेख कुर्बान, प्रभाकर सपकाळे, रशीद तडवी, माजी नगरसेवक शेख जफर, शेख जलील, संदीप भारंबे, भारत चौधरी, अन्वर खाटीक, विनोद मंडवाले, पिंटू मंडवाले, मलक आबिद, याकूब, खान, आसिफ तय्यब, शेख रफिक, युनूस तडवी, शेख मोमीन यांच्यासह शेकडो नागरीक सहभागी झाले.