तीन लाखांची कॉपर केबल लंपास : भुसावळात औद्योगिक वसाहतीतील धाडसी चोरीमुळे खळबळ

भुसावळ : शहरातील वरणगाव रस्त्यावरील औद्योगिक वसाहतीमधील जय इंण्डस्ट्रीजधधून चोरट्यांनी 25 हजारांच्या रोकडसह सुमारे तीन लाखांची कॉपर केबल लांबवल्याने व्यावसायीकांमध्ये घबराट पसरली आहे. रविवार, 30 रोजी चोरीचा प्रकार उघड झाला. चोरीची माहिती कळताच बाजारपेठ पोलिसांनी पाहणी केली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात नरेश काकुमल आठवाणी (56, नवजीवन सोसायटी, सिंधी कॉलनी, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिकार्‍यांची धाव
औद्योगिक वसाहतीत चोरी झाल्याची माहिती कळताच पोलिस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस स्टेशनचे सहा.निरीक्षक हरीष भोये, पोलिस उपनिरीक्षक महेश घायतड, शांताराम महाजन, शरीफ काझी, आयाज सैय्यद, नेव्हिल बाटली, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार, उमाकांत पाटील जावेद शहा आदींनी भेट देवून पाहणी
केली.

बंद सीसीटीव्ही पथ्थ्यावर
वरणगाव रस्त्यावर औद्योगिक वसाहत असून या ठिकाणी अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. भुसावळातील नरेश काकुमल आठवाणी (56, नवजीवन सोसायटी, सिंधी कॉलनी, भुसावळ) यांचीदेखील जय केबल इंण्डस्ट्रीज असून येथे कच्च्या मालावर प्रक्रिया करून केबल तयार केली जाते. आठवाणी यांनी शुक्रवारी रात्री कंपनी बंद करून घर गाठले व शनिवारी कामगारांना साप्ताहिक सुटी दिली व रविवारी नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजता ते कंपनीत गेले असता त्यांना कुलूप तुटलेले आढळल्याने चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.

तीन लाखांचा मुद्देमाल लंपास
आठवाणी यांच्या तक्रारीनुसार, चोरट्यांनी दोन लाख 12 हजार 500 रुपये किंमतीचे तांब्याच्या तारांचे बंडल, 44 हजार 625 रुपये किंमतीचे तांब्याचे तारांचे बंडल, 10 हजार 625 रुपये किंमतीचे तांब्यांचे तार तसेच 25 हजारांची रोकड मिळून दोन लाख 92 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल चोरून
नेला.