दोघांवर गुन्हा दाखल
पिंपरी : घरपट्टीची नोंद आणि घरपट्टीची पावती देण्यासाठी मुळशी तालुक्यातील आंबवणे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंचाने 2 लाख 80 हजार रुपयांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या दोन्ही लोकसेवकांना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई देवघर गावातील नेचर सोसायटी येथे करण्यात आली. याप्रकरणी देवघरगाव येथील एका नागरिकाने तक्रार दिली. सरपंच मछिंद्र चंद्रकांत कराळे (वय 44) आणि उपसरपंच गणेश गजानन मानकर (दोघे रा. आंबवणे, ता. मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्या लोकसेवकांची नावे आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे देवघरगाव येथे एक एकर क्षेत्र आहे. त्यामध्ये त्यांनी 2 हजार चौरस फूट घर बांधले आहे. या घराच्या घरपट्टीची नोंद करण्यासाठी आणि घरपट्टीची पावती घेण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीकडे मागणी केली असता त्यांना सरपंच आणि उपसरपंचांनी तीन लाख रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तडजोडीअंती ही रक्कम 2 लाख 80 हजार एवढी निश्चित झाली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. दोन्ही लोकसेवकांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे.