नवी दिल्ली : अलीकडेच तीन लाखांवरील रोखीचे व्यवहार बंद करण्यात येत असल्याची माहिती अर्थसंकल्प सादर करतांना दिेण्यात आली होती. या पार्श्वभूमिवर 1 एप्रिलनंतर तीन लाखांपेक्षा अधिक रुपयांचे रोखीचे व्यवहार करणार्यांवर 100 टक्के दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती महसूल सचिव हसमुख अधिया यांनी दिली. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अधिया यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली.
रक्कम घेणार्याला बसले भुर्दंड
हसमुख अधिया म्हणाले की, तीन लाखांवरील सर्व व्यवहार हे कॅशलेस करणे बंधनकारक आहे. एक एप्रिलनंतर कुणी 4 लाखाचा रोखीचा व्यवहार केलात, तर तुम्हाला त्यावर 4 लाख रुपये दंड आकारण्यात येईल. त्याचप्रमाणे जर कुणी 50 लाख रुपयांचा रोखीचा व्यवहार केलात, तर संबंधीत व्यक्तीला 50 लाख रुपयांचा दंड करण्यात येईल. विशेष म्हणजे ही रक्कम देणारा नव्हे तर स्वीकारणार्या व्यक्तीला हा दंड करण्यात येणार आहे. या तरतुदीमुळे मोठ्या रकमेच्या रोखीच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
दहा लाख कोटी जमा
दरम्यान नोटाबंदीच्या 50 दिवसांत बँकांमध्ये 500 आणि 1000च्या जुन्या नोटांच्या स्वरूपात 10 लाख कोटी जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. ही रक्कम म्हणजे बाजारातील रकमेच्या तुलनेत सुमारे दोन-तृतीयांश इतकी आहे. 10 लाख कोटी एवढी रक्कम जवळपास 1 कोटी बँक खात्यांमध्ये जमा केली गेली आहे. या सर्व माहितीचे विश्लेषण करण्यात येत असून, यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. तर प्राप्तिकर विभागाकडून चौकशीत संशयित आढळलेल्या जवळपास 18 लाख बँक खातेधारकांना ईमेल आणि एसएमएस पाठवण्यात आले आहेत.