पुणे : राज्यभरात स्वाईन फ्लूची लागण वाढतच चालली असून पुण्यातील परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे. संपूर्ण राज्यात पुण्यातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. शुक्रवारी या जीवघेण्या आजाराने एका तीन वर्षांच्या मुलीला मृत्यूच्या दाढेत ढकलले. पुण्यात स्वाईन फ्लूमुळे प्राण गमाविणार्यांची संख्या आता 30 वर पोहचली आहे.
शुक्रवारी मरण पावलेल्या मुलीस अहमदनगर येथून उपचारासाठी पुण्यात आणण्यात आले होते. 6 एप्रिल रोजी केलेल्या चाचणीत तिला स्वाईन फ्लू असल्याचे निष्पन्न झाले. उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. वर्ष 2017च्या सुरूवातीपासूनच स्वाईन फ्लूचे थैमान सुरू आहे. जानेवारी महिन्यापासून स्वाईन फ्लूची लागण झालेल्या 193 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 114 रुग्णांना या आजरातून वाचविण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे. तर 49 स्वाईन फ्लूचे रुग्ण शहरांतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यापैकी 23 रुग्णांची स्थिती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.