नवी दिल्ली। मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या तीन वर्षांत जनतेचा सरकारप्रति आत्मविश्वास वाढला आहे, मोदी सरकारने परिवारवाद, जातीवाद आणि तुष्टीकरणाच्या राजकारणापासून देशाला मुक्तता मिळवून दिली. तसेच तीन वर्षांत मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप लागला नसल्याचे यावेळी अमित शाह यांनी सांगितले.
सबका साथ सबका विकासाचा नारा देत सत्तेवर आलेल्या भाजपला नुकतीच 3 वर्षे पूर्ण झाली आहेत. याचा लेखाजोखा मांडण्यासाठी तसेच अनेकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या 70 वर्षांत जे जमले नाही ते या सरकारने तीन वर्षांत केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
सर्जिकल स्ट्राइक नंतर जगभरात एक मोठा संदेश गेल्याचे तसेच वन रँक वन पेन्शनची मागणी मोदी सरकारने पूर्ण केल्याचे अमित शाह म्हणाले. मोदी सरकारने मोठे पाऊल उचलत काळा पैसा संपवला तसेच पंतप्रधानांनी राजकिय इच्छाशक्ती दाखवली आणि भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राइक केल्याचे ते म्हणाले. आमचे सरकार हे दलित, मागासांचे सरकार असेल मोदीजींनी सांगितले होते तसेच आमचे सरकार पारदर्शी कारभार करेल आणि विरोधकही आमच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप लावू शकणार नाहीत असेही सांगितले होते, आज तीन वर्षांनंतर आम्ही हे खरे ठरल्याचे दाखवून दिले आहे. देशाच्या राजकारणात गेल्या तीन वर्षांत आमूलाग्र बदल झाल्याचेही अमित शाह यांनी यावेळी सांगितले.