भुसावळ । शहरातील बहुप्रतिक्षीत व अतिशय दयनिय अवस्था झालेल्या वरणगाव रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास सुरुवात झाली असून शिवाजी नगरपरिसरात रस्त्याच्या कामास गती मिळाली आहे. यामुळे शहरातील नागरिकांना रस्त्यामुळे सहन करावा लागणारा त्रास दुर होणार असल्यामुळे शहरवासियांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. वरणगाव रस्ता म्हणजे शहराला लागलेले ग्रहणच समजले जायचे या परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डेच खड्डे पहायला मिळत होते.
रस्त्यांच्या त्रासापासून नागरिकांची केली सुटका
या खड्डयांमुळेच अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सर्वप्रथम रस्त्यांच्या त्रासापासून नागरिकांची सुटका करण्याचा प्रयत्न केला असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. सर्वाधिक खड्डे पडलेल्या वरणगाव रोडचे डांबरीकरण आणि मजबुतीकरण अखेर सुरू झाले आहे.
2006 रखडले होते रस्त्याचे काम
आठ वर्षांपासून जर्जर झालेल्या या रस्ते कामाला 15 रोजी आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते सुरुवात होणार होती. मात्र, आचारसंहितेमुळे भूमीपूजन पुढे ढकलण्यात आले असले तरी कामात आता कुठलेही व्यत्यय नको म्हणून काम सुरु करण्यात आले आहे. यापूर्वी 2006मध्ये वरणगाव रोडचे अर्धवट काम झाले होते. मात्र, अवघ्या दोन वर्षात रस्ता खराब झाला. मध्यंतरी या रस्त्यावरील खड्ड्यांनी दोघांचे बळी घेतले.
कामाला जोरात गती
त्यामुळे तत्कालिन नगराध्यक्ष अख्तर पिंजारी यांनी वरणगाव रोडचे डांबरीकरण मजबुतीकरणाची निविदा प्रक्रिया केली होती. मात्र त्यामुळे आता या रस्त्याच्या कामास जोमाने सुरुवात झाली आहे. वर्षानुवर्षापासून या रस्त्यावर पडलेले खड्डे हे मोठा चर्चेचा व राजकारणाचा विषय ठरला होता. याच रस्त्यावर अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. पालिकेने याअगोदर वारंवार निवीदा काढली असताना देखील कामाचा मोबदला मिळणार कि नाही याची शाश्वती नसल्यामुळे कुणीही कंत्राटदार काम करण्यास धजावत नव्हता त्यामुळे आता सत्ताधार्यांनी प्राधान्याने या रस्त्याच्या कामास सुरुवात केली आहे. यासह आता शहरातील इतरही रस्त्याच्या कामांना गती देऊन त्यांची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे.