तीन वर्षांपासून हरवलेल्या मुलीला पाहताच आई-वडिलांनी मारली मिठी

0

आधार कार्ड ठरले महत्वाचा दुवा ; संस्कार बालगृहासह पोलिसांनी बजावली सकारात्मक भूमिका

धुळे- जळगाव रेल्वे स्थानकावर गेल्या तीन वर्षांपूर्वी सापडलेल्या गीता किशन या गतिमंद मुलीच्या पालकांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. या मुलीला बुधवारी तिच्या पालकांच्या स्वाधीन करताना व निरोप देताना धुळ्यातील संस्कार बालगृहातील सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते. गेल्या तीन वर्षांपासून आई-वडिलांचे छत्र असतानाही केवळ ताटातुट झाल्याने त्यांच्यापासून लांब असलेल्या मुलीला पाहताच आई-वडीलांनाही गहिवरून आले. तब्बल तीन वर्षांच्या अथक परीश्रमानंतर केवळ आधार कार्डमुळे आई-वडीलांची या प्रकरणात मुलीही भेट झाली हेदेखील विशेष !

जळगावात हरवलेली गीता
गेल्या तीन वर्षांपूर्वी अहमदाबाद-हावडा एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाला रेल्वेत गतिमंद बालिका आढळली. जळगाव येथील केशव स्मृती प्रतिष्ठान आणि जळगाव पोलिसांच्या मदतीने तिला बालसुधारगृहात पाठविण्यात आले. चौकशीवेळी तिने गीता किशन असे नाव सांगितले. त्याच नावाने बालकल्याण समितीमार्फत गीता किशनला 14 जुलै 2015 ला धुळे शहरातील संस्कार बालगृहात दाखल करण्यात आलं. धुळ्यातील संस्कार बालगृहात दाखल झाल्यानंतर प्रथम तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मानसोपचार तज्ज्ञांनी केलेल्या तपासणीत ती 49 टक्के गतिमंद असून मराठी भाषा समजत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिचा ठावठिकाणा शोधणे कठीण झाले. तिचे वेळोवेळी आधार कार्ड काढण्याचा प्रयत्न झाला. 2 वर्ष गीता किशनचे खरे नाव शोधण्याचा प्रयत्नात ई सेवा केंद्र चालकांनी आधार कार्यालयाशी संपर्क साधून अंगठ्याच्या ठश्यांवरून तिचे कार्ड मिळवून दिले. त्यात गीता किशनचे खरे नाव सुशीला पिंगुवा क्रिश्ना चंपीला असे असून ती मूळची झारखंड येथील कुमारडुंगी पश्चिमी सिहभूम येथील असल्याचे आढळले. गीता किशन ही हरविल्याबाबत कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल नव्हती. त्यावेळी संस्थेचे संचालक सुनील वाघ यांनी देवपूर पोलीस ठाण्यात तत्कालीन निरीक्षक दत्ता पवार यांना माहिती दिली. पवार यांनी झारखंड पोलिसांशी संपर्क साधला.

पोलिसांच्या मध्यस्थीने गीताचा मिळाला ताबा
गीताच्या पालकांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्यांना धुळ्यात येणे शक्यत नव्हते मात्र पोलिसांच्या प्रयत्नानंतर आदिवासी पाड्यातील रहिवासी असलेल्या पालकांनी झारखंड पोलिसांची मदत घेत बुधवारी धुळे गाठले. गीताला बुधवारी तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं. यावेळी निघतांना गीताने सगळ्यांची भेट घेतली. गीताला निरोप देतांना संस्कार बालगृहाचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांना अश्रू अनावर झाले. या बालगृहातील गीताच्या मैत्रिणींना देखील गीताला निरोप देतांना अश्रू अनावर झाले होते. गेल्या तीन वर्षांपासून गीता याठिकाणी राहत होती मात्र आज तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया संस्कार बालगृहाचे संचालक सुनील वाघ यांनी व्यक्त केली.